Anna Hazare : फडणवीस चांगलं काम करतात, त्यांचा साधेपणा मला आवडतो; अण्णा हजारेंकडून कौतुक

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचे आणि साधेपणाचे कौतुक करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एका मराठी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अण्णा हजारे यांनी फडणवीस यांना भ्रष्टाचारमुक्त आणि समाजहितासाठी कार्यरत नेता म्हणून गौरवले. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावरही सूचक भाष्य केले, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
अण्णा हजारे काय म्हणाले?
अण्णा हजारे यांनी फडणवीस यांच्याबाबत सांगितले, “देवेंद्र फडणवीस यांचा कधी फोन येत नाही, तसा आमचा थेट संबंधही नाही. पण ते चांगलं काम करतात. माणसाने चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायलाच हवं. त्यातला त्यात फडणवीस चांगलं काम करत आहेत.”
त्यांनी पुढे फडणवीस यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना म्हटले, “ते समाजाच्या भल्यासाठी काम करतात. एखादा शब्द टाकला तर तो मोडत नाहीत. देश आणि समाजाच्या हितासाठी असे कार्यकर्ते तयार व्हायला हवेत.
या दृष्टीने फडणवीस मला चांगले वाटतात.” विशेष म्हणजे, अण्णांनी फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नसल्याचे ठामपणे नमूद केले. “आजपर्यंत फडणवीस यांच्याबाबत कोणतीही वाईट गोष्ट किंवा भ्रष्टाचाराचं प्रकरण माझ्या कानावर आलं नाही. माणसाने चांगल्या मार्गाने जावं, आणि फडणवीस त्या मार्गाने चालत आहेत. त्यामुळे ते मला आवडतात,” असे अण्णा हजारे म्हणाले.
मोदी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कारभारावर बोलताना अण्णा यांनी सूचकपणे टीका केली. “मोदी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, रूक गये तो खटारा,” असे म्हणत त्यांनी राजकारणातील स्वार्थावर बोट ठेवले.
“राजकारणात सगळं चांगलं नसतं, कुठे ना कुठे स्वार्थ असतो. काही लोकांनी माझा राजकीय फायदा घेतला, त्यांचा स्वार्थ होता,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 2011 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या वेळी काही राजकीय नेत्यांनी आपला गैरफायदा घेतल्याचा संदर्भ त्यांनी यात दिला.





