Nitin Raut : काँग्रेस नेते नितीन राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शक्तीपीठ मार्गाला दर्शवला पाठिंबा

नागपूर : नागपुर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसच्या वतीने या प्रकल्पासाठी जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना शक्तीपिठ महामार्गासाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी याबरोबरीने त्यांनी दिल्ली हैदराबाद कॉरिडोर, समृद्धी महामार्ग व प्रस्तावित शक्तीपीठ या तिनही महामार्ग एकमेकांना जोडून एकत्रित महामार्ग त्रिकोण उभारण्याची मागणी देखील केली आहे.
नितीन राऊत हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याने, त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेली मागणी देखील विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीकोणातून महत्त्वाची आहे. या तिनही महामार्ग जोडण्यात आल्यास देशातील पहिला सुवर्ण त्रिकोण तयार होवू शकेल, जेणेकरून विदर्भ हा भाग देशाचे लॉजिस्ट्क्स केंद्र म्हणून विकसीत होवू शकेल.
राऊतांनी आपल्या पत्रात, विदर्भाला कृषी, खनिज, पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा सुवर्ण त्रिकोण झाल्यास १ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक विदर्भात आणता येणार आहे. पाच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती शक्य होणार आहे. विदर्भातील कापूस, संत्री, खनिज निर्यातीला गोव्याच्या बंदरामार्गे जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मिहान सेझ व ड्राय पोर्टमुळे नागपूरला देशातील सर्वात मोठे अंतर्गत कार्गो हब बनण्याची संधी मिळू शकेल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दोन वेगळे मतप्रवाह
शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमीन अधिग्रहित केल्या जातील. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. तसेच या भागातील नैसर्गिक संतुलन बिघडेल, असा दावा करत स्थानिक नागरिक तसेच काँग्रेस पक्षाने शक्तिपीठला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ मार्ग विदर्भातील आणि मध्य भारतातील खनिज संपत्ती अदानी यांच्या पोर्टपर्यंत पोहोचवण्यासाठीच तयार करण्याचा डाव आहे, असा आरोप केला आहे. परंतु राऊत यांनी शक्तिपीठचे समर्थन केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्येच शक्तीपिठासंदर्भात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.





