Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले… कुणीही असो कारवाई…

बीड : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये सारखी घटना खपवून घेतली जाणार नाही. कुणीही असो कारवाई होईल. फक्त बीडच्या जनतेला विनंती आहे. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. आपण एकत्र राहू आपला दादीपमान इतिहास जपू. बीडचा जुना इतिहास पुन्हा जनतेसमोर आणला पाहिजे. नविन बीड निर्माण करु, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज (दि.५) आष्टी उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, ज्यावेळी कृष्णा, भीमा खोऱ्याचे नियोजन सुरु होते. तेव्हा भीमेच्या उपखोऱ्यात मराठवाड्याचा भाग येतो. त्यामुळे मराठवाड्याला खोऱ्याचे पाणी मिळाले पाहिजे. अशा प्रकारचा विचार पुढे आला. त्यातून गोपीनाथ मुंडेंसारख्या अनेक नेत्यांनी कृष्णा खोऱ्यातील २३ टीएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवे असा प्रयत्न केला.
त्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही. खोऱ्यातील पाणी धाराशिव जिल्ह्यात यायचे होते, मग तिथून बीडला मिळणार होतं. मुख्यमंत्री म्हणून याचा आम्ही पाठपुरावा केला. या प्रकल्पाला मान्यता दिली. निधी उपलब्ध करुन दिला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंसारखा पहाडाएवढा नेता जिल्ह्याने दिला : सुरेश धस
सुरेश धस म्हणाले, काही लोक म्हणतात, बीड जिल्ह्याची बदनामी होते, परंतु या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांना निवडून दिले आहे. तर गोपीनाथ मुंडेंसारखा पहाडाएवढा नेता या जिल्ह्याने दिला आहे. अनेक राजकारण्यांची जडणघडण या जिल्ह्याने केली आहे.
पुढे म्हणाले, आज कार्यक्रम घेतोय, ही जमीन रक्षा मंत्रालयाकडे जाणार होती. तीन दिवस माझ्यासोबत मुंडे साहेब झोपून राहिले. जमीन सोडवण्यासाठी खूप दगड झेलले. तत्कालीन रक्षा मंत्री जॉर्ज फर्नांडिस येथे आले होते. हे कॅन्सल करुन घेतले. म्हणून हा कुंटेफळचा प्रकल्प होत आहे, असंही सुरेश धस म्हणाले.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध मकोका लावला पाहिजे
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. या संदर्भात सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात ठाम भूमिका घेतली. भूमाफिया, वाळू माफिया आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध मकोका लावला पाहिजे, आणि तुम्ही तो लावाल, अशी अपेक्षा सुरेश धस यांनी व्यक्त केली.





