निवारा शेडमधील लोकांना सुविधा द्या

सातारा – निवारा शेडमध्ये असणाऱ्या नागरिकांना अन्न, पिण्याचे शुध्द पाणी, औषधे आदी सर्व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा. रात्री अपरात्री लोंकाना औषधोपचारासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, प्राथमिक आरोग्य केंद्रे 24ु7 उपलब्ध राहतील याची आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्ह्याला देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांकडून जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हृयाकडे लक्ष असून पावसाळी स्थितीत आवश्यक त्या सर्व उपाय योजनांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची त्यांनी ग्वाही दिल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, “”पावसाळी परिस्थीतीत पाणी तुंबू नये यासाठी सक्तीने नालेसफाई करावी. फॉगिंग करावे, नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी अधिकचे मनुष्यबळ वापरुन लवकरात लवकर विद्युत प्रवाह सुरळीत करण्यात यावा. पर्यटनस्थळी दारु पिऊन हुल्लडबाजीचे प्रमाण वाढले आहे.
धोकादायकपणे पर्यटकांनी पाण्यात जाऊ नये यासाठी वन विभाग, पोलीस व उत्पादनशुल्क यांनी संयुक्तपणे नियमन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कार्यक्रमाची गतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी दरमहा आढावा घेण्यात यावा. पावसाळ्यातील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी नियोजन करण्यात यावे, असे सांगून खा. श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यासाठी लवकरच जवळपास दोन कोटी रुपये किमतीची सुस्सज्ज व अद्ययावत रुग्णवाहिका केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. कराड येथे विमानाची धावपट्टी मोठी करण्यासाठी पालकमंत्री देसाई यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोयना धरण 43.14 टीएमसी भरले असून जिल्ह्यातील सर्व धरणांतील एकूण पाणीसाठा टक्केवारी 44.27 टक्के आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवून सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नदीकाठची संभाव्य पूरप्रवण गावे, संभाव्य दरडप्रवण गावे अशा 96 गांवाचे जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुणे यांच्यामार्फत फेरसर्वे करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही डुडी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची सर्व यत्रंणा, आरोग्य पथके प्रत्यक्ष कार्यस्थळावर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. दरड कोसळणे अथवा भूस्खलनासारखे प्रकार साधारणपणे रात्रीच्या वेळी होत असल्याने संवेदनशील ठिकाणी रात्रीच्या पोलीसांच्या गस्ती वाढविण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सांगितले.
47 निवारा शेडमध्ये 489 कुटुंबे स्थलांतरित
जिल्ह्यात तात्पुरते 47 निवारा शेड बांधण्यात आले असून सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथील 18, सांडवली येथील 20, भैरवगड येथील 60, जावळी तालुक्यातील बोंडारवाडी येथील 6, भूतेघर येथील 3, वहीटे येथील 3, वाटंबे येथील 2, वाई तालुक्यातील जोर येथील 8, गोळेगाव-गोळेवस्ती येथील 4, पाटण तालुक्यातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील 150, गुंजाळी येथील 6, म्हारवंड येथील 56, जोतिबाची वाडी येथील 5, सवारवाडी येथील 18, पाबळवाडी येथील 4, बोंगेवाडी येथील 14, केंजळवाडी येथील 21, कळंबे येथील 4, जिमनवाडी येथील 22, तर महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतुरबेट, मालुसर, एरणे येथील 65 अशा एकूण 489 कुटुंबाचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांना अन्न, शुध्द पेय जल व अन्य अनुषंगिक सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.





