पिंपरी | निगडी ते देहूरोड दरम्यान वारकर्यांसाठी सुविधा द्या

देहूरोड, (वार्ताहर)- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत तसेच मुंबई-पुणे महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यान पालखी सोहळ्यात भाविक वारकर्यांसाठी होणार्या गैरसोयी दूर करून सोयी सुविधा पुरवण्याची मागणी चिंचोली येथील बाळासाहेब जाधव यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली आहे.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आठ दिवसात येऊन ठेपला आहे. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी पालखी मार्गावरील पहिला विसावा (शनि मंदीर परिसर) ठिकाणी साफसफाई व झाडे-झुडपे छाटण्याची तसेच तेथील सपाटीकरण करणे,
मार्गावर सीओडी ते देहूरोड दरम्यान सुमारे 26 गतिरोधक असून शासकीय निकषानुसार नसल्याने ते काढणे, पालखी मार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा असणारे खड्डे बुजवून मुरुमीकरण करणे,
पालखी मार्गावर कचरा उचलला जात नसल्याने दुतर्फा घाणीचे साम्राज्य असून स्वच्छता करणे, मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते देहूरोड दरम्यानचे तुटलेले लोखंडी रेलिंग दुरुस्त करणे. गवत, काटेरी झुडपे काढणे,
देहूकडे दर्शवणारे फलक दुरुस्त उभारणे, मार्गावरील बंद पथदिवे, हायमास्ट सुरू करणे. दिशादर्शक फलक लावणे, गतिरोधक व रस्त्यांवरील धूसर झालेले पांढरे पट्टे आखून घेणे आदी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.





