Sameer Wankhede | Shah Rukh Khan | Aryan Khan | Gauri Khan | Bads Of Bollywood : आयआरएस अधिकारी आणि एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या मालिकेबद्दल २ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या मालिकेत त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी “खोटे, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक मजकूर” असल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी असा दावा केला की, या शोमध्ये ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांचे दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण केले जाते, ज्यामुळे त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो. तसेच ही मालिका जाणूनबुजून रंगीत आणि पूर्वग्रहदूषित पद्धतीने त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने रचली गेली आहे. विशेषतः जेव्हा त्यांच्या आणि आर्यन खान यांच्यातील खटले मुंबई उच्च न्यायालय आणि एनडीपीएस विशेष न्यायालय, मुंबईसमोर प्रलंबित आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केला की न्यायालयीन छाननी सुरू असताना हे चित्रण त्यांना अन्याय्यपणे लक्ष्य करत आहे. असं त्यांनी म्हंटलं आहे. मालिकेत नेमकं काय दाखवले? ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड‘मधील एका विशिष्ट दृश्याचा संदर्भ देत, ज्यामध्ये ‘सत्यमेव जयते’ म्हटल्यानंतर एका पात्राने अश्लील हावभाव केला होता, असा दावा खटल्यात करण्यात आला आहे. हे कृत्य राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या तरतुदींचे गंभीर आणि संवेदनशील उल्लंघन आहे, ज्या कायद्यानुसार दंडात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. याशिवाय, मालिकेतील मजकूर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे, कारण तो अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्रीच्या वापराद्वारे राष्ट्रीय भावना दुखावण्याचा प्रयत्न करतो. समीर वानखेडे यांनी त्यांच्या खटल्यात कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्यासाठी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या खटल्यात शोचे स्ट्रीमिंग आणि वितरण रोखण्यासाठी न्यायालयाचे निर्देश आणि त्याच्या बदनामीकारक स्वरूपाची घोषणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. वानखेडे यांनी असा युक्तिवाद केला आहे की, त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याव्यतिरिक्त, ही सामग्री ड्रग्ज कायदे लागू करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांवरील विश्वासाला धक्का देते.