फेस आयडीमुळे कर्मचारीवर्ग त्रस्त; २५ दिवसांनतरही खेळखंडोबा सुरूच

मुंबई : फेस आयडीनेच मंत्रालयात प्रवेश या पध्दतीने रोजच कार्यालयात पोचायला उशिर होत असल्याने कर्मचारी वर्ग त्रस्त झाला असून जोपर्यंत फेस आयडीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत जुन्या पध्दतीने प्रवेश ठेवावा असा मागणीवजा संतप्त सूर ते त्यांच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे काढत आहेत.
मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे फेस आयडी प्रवेश करण्याची प्रक्रिया जवळपांस २५ दिवसांनतरही खेळखंडोबा सुरूच असल्याने कर्मचारी व प्रवेश देण्यासाठी मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असणारे पोलीस यांच्यात वादंग जुंपत आहे. त्यात आणखीन कार्यालयात पोहचायला वेळ लागत आहे. पण पोलीस ऐकत नसल्याने लवकर येऊनही लेटमार्क नोंदवला जाण्याची टांगती तलवार कर्मचाऱ्यांवर आहे.
प्रवेशाबाबतचा त्रास गृहविभागामार्फत दिल्या गेलेल्या ओळखपत्र व शासनमान्य पत्रकारांनाही होत आहे. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमूक एका गेटनेच प्रवेश दिला जाईल, असे बंधन घालण्यात आल्याने त्यांनाही प्रेसरुम, मंत्री व उच्चाधिकाऱ्यांकडे जायला उशिर होतो. यासंदर्भात प्रवेशासाठी संपर्क साधला असतात सेक्युअरटेक नावाच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
ते जे सॉफ्टवेअर वापरतात त्यामुळे त्यांना नेट मिळताना तांत्रिक दोष निर्माण होतात. तर काही प्रवेशाबाबत ज्यांचे नंबरची प्रक्रिया होऊन त्यांचेकडे फोटो व ईतर माहितीसाठी जातात तेव्हा ती माहिती त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये संकलीत व्हायला वेळ लागतो. यात नंबर वा स्पेलिंगमधली बारीकशी चूक फेस आयडीकरिता त्रासाची ठरते.
दरम्यान, कंपनीने हे काम घेताना सात दिवसांत म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे त्यांना हे काम मंत्रालयाच्या आयटी डिपार्टमेंटने सोपवले होते. परंतु अद्यापपर्यंत त्यांचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत संबंधित खात्याकडून प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत आमचा व खात्याचा नंबर जुळणार नाही. त्यामुळे कंपनीला कंत्राट देणाऱ्या उच्चाधिकाऱ्यालाही कर्मचारी व प्रवेश करु इच्छिणारे लाखोल्या वाहात आहेत.

