Manchar : आदिवासी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत
Manchar : पाचशेहून अधिक आदिवासी बांधव, महिला बचत गटांच्या सदस्या, विद्यार्थी तसेच विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले होते.

मंचर : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्या सेवा संकल्प अभियान 2026चा शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव, ता. आंबेगाव येथे उत्साहात झाला. अभियानानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने परिसर दुमदुमून गेला.
प्रकल्प कार्यालयापासून पंचायत समिती चौक मार्गे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेपर्यंत सेवा यात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषा आणि आदिवासी योजनांची माहिती देणारे फलक हे प्रभात फेरीचे आकर्षण ठरले. पाचशेहून अधिक आदिवासी बांधव, महिला बचत गटांच्या सदस्या, विद्यार्थी तसेच विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले होते.
यानंतर आश्रमशाळेत आदिवासी मेळावा घेण्यात आला. वनहक्क कायदा, शबरी महामंडळाच्या स्वयंरोजगार योजना, राणी दुर्गावती महिला बचत गट सबलीकरण, न्यूक्लियस बजेट आणि थेट लाभ हस्तांतरण योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 12 लाभार्थ्यांना पेसा दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराम लांडे, पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती पारधी, दत्ता गवारे, जनाबाई उगले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रियंका घनवट, संदीप पाटील, रवींद्र माळवे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांची माहिती आणि लाभ पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनाशी संपर्क साधावा.
-गणेश इवनाते, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव





