पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेपत शिस्तभंग समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष जालिंदर जाधव तसेच पक्षाचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आला. समितीने काय लावले आरोप? “लोकसभेत राजू शेट्टी याचा पराभव झाल्यानंतर आम्ही काम करत आहोत. संघटनेचे नेते रविकात तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही. त्यांना संघटेने लाल दिवा दिला, पद दिले. एकदा पक्ष सोडला परत आले, काम करत राहिले. अलिकडे ते ऊस परिषदेस उपस्थितीत राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत, असे जालिंदर जाधव म्हणाले. “शिस्तभंग समिती नेमली त्यांना पत्र दिलं ते आले नाहीत. ते पक्ष राज्य कार्यकारणीला पण उपस्थितीत राहिले नाहीत. रविकांत तुपकर मीडियातून बोलत राहिले. आता लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले. राजू शेट्टी यांच्या विरोधात तुपकर बोलत राहिले, तुपकर यांच्यामुळे चळवळीच नुकसान होत आहे,” असे या शिस्तपालन समितीने स्पष्ट केले आहे. कोण आहेत रविकांत तुपकर ? रविकांत तुपकर हे महाराष्ट्रातील राजकारणी व चळवळीचे अग्रणी नेते आहेत. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता.