Pune Fire News : मुळशीतील अंबडवेट येथील रासायनिक कंपनीत स्फोट; तीन जण होरपळले

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथील स्वराज एंटरप्राइजेस या सोडियम क्लोराइड पॅकेजिंग कंपनीत रविवारी दुपारी 12:15 वाजता भीषण स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींमध्ये संदीप लक्ष्मण शेंडकर (49), मोहित राज सुखन चौधरी (49) आणि महिला रेणुका धनराज गायकवाड (40) यांचा समावेश आहे. तिघांनाही तातडीने घोटावडे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन पुरुषांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. रेणुका गायकवाड यांची प्रकृती स्थिर असली, तरी त्यांच्यावरही वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी 12:15 च्या सुमारास स्वराज एंटरप्राइजेसमध्ये सोडियम क्लोराइड पॅकेजिंग प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला, ज्यामुळे आग भडकली. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले, ज्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले.
मारुंजी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पौड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच, तहसीलदार विजयकुमार चोबे, आपत्ती व्यवस्थापन मुळशी अध्यक्ष प्रमोद बलकवडे, स्वातीताई ढमाले , ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते.
पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिसर सील केला असून, बचाव कार्याला गती दिली आहे. मारुंजी अग्निशमन दलाने दोन फायर इंजिन्सच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, रासायनिक प्रतिक्रिया किंवा इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी कंपनीतील कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.





