‘द कश्मीर फाईल्स’मधून अनुभवा काश्मिरी पंडितांच्या वेदना, दुःख आणि संघर्ष; सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची सध्या खूप चर्चा सुरू आहे. या आगामी सिनेमाचा आज (दि. 21) ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, हा सिनेमा जगभर रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेत ‘द कश्मीर फाईल्स’चे एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते.
हा सिनेमा मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या सिनेमाची प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात असून, आता सिनेमा येत्या 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरदेखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट असल्याचे दिसून येत आहे.
हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या सिनेमाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.





