वर्धापनदिन महोत्सव : विस्तारणारे पुणे प्रगतीच्या नव्या टप्प्यावर

पुणे शहराला सुखद हवामान,
समाज सुधारकांबरोबरच औद्योगिक-शैक्षणिक-सांस्कृतिक परंपरा असा मोठा वारसा लाभलेला आहे. जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेकांचा या शहराच्या जडण-घडणीत मोठा वाटा आहे. आता या शहराच्या सीमा चहूबाजूंनी विस्तारत आहेत. त्याचवेळी आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होताना दिसत आहे. बहुविध संस्कृती आणि नागरिकांना सामावून घेणारे हे शहर आता प्रगतीच्या नव्या टप्प्यावर आहे.
पुणे महानगर म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक राजधानी. त्याबरोबच आता माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील आघाडीच्या शहरांपैकी एक अशी पुण्याची नवी ओळख झालेली आहे. पुण्यातील सुखद हवामान, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशविदेशातील चटपटीत खाद्यपदार्थांची रेलचेल, याबरोबरच शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या संधी यामुळे देशभरातून लोकांची पुण्याला पसंती असते. त्यामुळेच आज अनेक क्षेत्रात पुण्याने आघाडी घेतलेली दिसते.
असे असले तरी पुण्यातील वाहतूक आणि विशेषतः सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबाबत कुठल्याही राजकीय नेतृत्वाने ठोस पावले न उचलल्याने आजही पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे.
ही उणीव सोडली तर आज पुणेकर कल्पकता, मेहनत, कष्ट याद्वारे सातत्यपूर्ण प्रयतकतून शहराचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. अशा या अथक प्रयत्नांमुळे आजच्या घडीला पुण्यात आयटीखेरीज अनेक उद्योग-व्यवसाय बहरले आहेत. पुणे शहराच्या भोवती असणाऱ्या टेकड्या हे पुण्याचे वैशिष्ट्य् आहे. या टेकड्या म्हणजे तळजाई, पर्वती, लॉ कॉलेजची टेकडी, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी. रोज या टेकड्यांवर हजारो पुणेकर फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी जात असतात. ऐतिहासिक सिंहगडाला पाठीशी घेऊन मुळा-मुठा नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेले पुणे आता वेगाने विस्तारत आहे.
पुण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर गेल्या 25 वर्षात वेगाने बदलत गेले. या शहराने काळानुरूप नव्या गोष्टी आत्मसात केल्या. शहरात अनेक शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या. सातत्यपूर्ण प्रयतकंतून आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातून त्यांनी देशात आणि परदेशांत स्वतःची ओळख निर्माण केली. महात्मा जोतिबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी इथूनच समाजाला शिक्षित करण्याच्या महान कार्याला सुरवात केली. दोघांना त्यावेळच्या सनातनी लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे काम चालू ठेवले. त्यांनी जो स्त्री शिक्षणाचा आणि सामाजिक सुधारणांचा पाया घातला त्यातूनच आज पुण्याला पुरोगामी विचारांचे शहर अशी ओळख मिळाली आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रिया या मातीत घडल्या. त्यांनी वेळोवेळी जुनाट विचारांना आणि परंपरांना धक्का देत त्या झुगारण्याचे धैर्य दाखवले. त्यातूनच आज महिलांसाठी कर्तृत्वाच्या नव्या संधी देणारे एक सुरक्षित शहर अशी पुण्याची देशभरात ओळख बनली आहे. पुण्यात शिक्षण आणि नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे आणि अर्थातच पुण्याच्या विकासातील त्यांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे.
औद्योगिक प्रगतीत पुणे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. त्यातून आज पुणे हे नोकरी-व्यवसाय-रोजगारांच्या संधी देणाऱ्या देशातील प्रमुख शहरांपैकी एक बनले आहे. जगातील सर्वाधिक दुचाकी वाहने बनवणारी बजाज अटो, सर्वाधिक प्रवासी वाहने बनवणारी टाटा मोटर्स, मर्सिडिझ बेंझ, फोर्स मोटर्स, रांजणगावला फियाट इंडिया, लॅंड रोव्हर, चाकणमध्ये फोक्सवॅगन, फोर्स मोटर्स, जेसीबी, बारामतीतील पियाजिओ आणि व्हेस्पा, सणसवाडीतील जॉन डिअर या कंपन्यांममुळे पुण्याने वाहन उत्पादनाच्या जागतिक नकाशावर ठळकपणे स्थान मिळवले आहे. या उद्योगांमुळे पुणे परिसरातील लघुउद्योगांमध्ये वाढ होऊन रोजगाराच्या संधी तसेच त्यापाठोपाठ बांधकाम, हॉटेल, शिक्षण, पर्यटन याबरोबरच सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळत गेली.
हिंजवडी येथे विकसित करण्यात आलेल्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे गेल्या दोन दशकांमध्ये पुण्याच्या प्रगतीला मोठा वेग प्राप्त झाला. आज याठिकाणी इन्फोसिस, केपीआयटी, कॉग्निजंट, ईक्लर्क्स, सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीज, टीसीएस, पर्सिस्टंट सिस्टीम्स, विप्रो अशा नामांकित कंपन्या कार्यरत आहेत. त्याखेरीज शहरात आणि मगरपट्टा, खराडी परिसरात असंख्य आयटी कंपन्या कार्यरत आहेत. याठिकाणी असलेल्या रोजगार संधी आणि देशभरातून नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्यांमुळे परिसरात अनेक सेवाक्षेत्रात रोजगारांच्या संधी वाढण्यास हातभार लागलेला आहे.
आज पुणे चहूबाजूंनी वाढत आहे. पुण्याची लोकसंख्या वाढत आहे. आधी राहण्यासाठी लोकांची पसंती कोथरूड, कर्वेनगर, औंध-पाषाण या भागाला असायची. आता प्रशस्त घरांसाठी लोक पिंपरी-चिंचवड, वाकड, रावेत, पुनावळे, चिखली, चऱ्होली, विमाननगर लोहगाव, वाघोली-केसनंद, मांजरी-उरळी कांचन, कोंढवा, सिंहगड रस्ता, बावधन, सूस या परिसरांना पसंती देत आहेत. या सीमा ओलांडून अगदी चाकण, राजगुरूनगर रांजणगांव, शिरूर, यवत, पौड अशा ठिकाणीही अनेक अत्याधुनिक सोयींनी युक्त गृहप्रकल्प साकारले गेले आहेत आणि नवीन होताना दिसत आहेत. पुणे आणि परिसरातील सर्वांगीण प्रगतीमुळे याठिकाणी देखील घरखरेदीला लोक पसंती देताना दिसत आहेत. घरांबरोबरच अंतर्गत सजावट, फर्निचरसह टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन अशा गृहपयोगी बाजारपेठेचाही पुणे परिरसरात मोठा विकास झालेला दिसतो. आज पुणे महानगर आणि परिसरात पारंपरिक सऱाफ व्यावसायिक चाकण, नारायणगांव, बारामती याठिकाणी स्वतःची दालने सुरू करत आहेत तर या क्षेत्रातील देशातील नावाजलेले ब्रॅंड पुणे शहरात पदार्पण करत आहेत आणि या सगळ्यांना मिळणारा प्रतिसाद हा पुण्यातील वाढत्या सुबत्तेचे लक्षण आहे.
पुणे महानगराच्या वेशी विस्तारत आहेत. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) संस्थेने रस्तेविकासाबरोबर अनेक विकासकामे वेगाने करण्याची गरज आहे. आज केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही विविध पक्षांनी सत्ता उपभोगलेली आहे. मात्र, कुणीही पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची आणि वेगाने, दूरदृष्टीच्या उपाययोजना करण्याची तसदी घेताना दिसत नाही. मेट्रो, बीआरटी यासारखे दिखाऊ प्रकल्प पुणेकरांच्या माथी मारले जातात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करण्यात कुणालाही रस असल्याचे दिसत नाही. मोडकळीस आलेली आणि अनुदानावर जगणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच भविष्यातील पुण्याच्या प्रगतीतील मोठा अडसर ठरण्याची चिन्हे आहेत. शहर सुधारणेच्या नावाखाली पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट ब्लॉकच्या उलथापालथी जागोजागी करण्यापेक्षा राज्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.





