Exit Polls | Thackeray Group : ‘हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ’; एक्झिट पोलवरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

Exit Polls | Thackeray Group – सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हेसुद्धा सांगून टाकले. भाजपाला 350 जागा मिळाव्यात असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवले आहे?
2014 आणि 2019पेक्षा मोदींना लोक भरभरून मते देत आहेत आणि मोदी तिसऱ्यांदा विजयी होत असल्याचे चित्र निर्माण करणे, हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांच्या मतदानासंदर्भात संपूर्ण ‘डाटा’ बाहेर आलेला नाही. त्यामुळे या राज्यांत काय निकाल लागतील, त्याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही, पण या सगळ्या राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिले की,
पुन्हा एकदा मोदीच येत आहेत आणि भाजपाला तसेच त्यांच्या आघाडीस 350पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, असा निशाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून साधला आहे.
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात 1 तारखेस निवडणुका झाल्या. पश्चिम बंगालातील 10 जागांसाठी साधारण 59.15 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोग चार-पाच दिवसांनी या आकड्यात आणखी पाच-दहा टक्क्यांची भर टाकेल. मग एक्झिट पोलवाल्यांनी पश्चिम बंगालमधील निकाल कोणत्या आधारावर लावले? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
हरियाणात एकूण लोकसभेच्या 10 जागा आहेत. 10 लोकसभा जागा असताना तेथे भाजपप्रणीत एनडीएला 16 ते 19 जागा मिळतील असे एका एक्झिट पोलमध्ये दाखवले. हिमाचल प्रदेशात फक्त चार जागा असताना या राज्यात एनडीए सहा ते आठ जागा जिंकेल, असा निकाल दिला आहे.
बिहारमध्येदेखील लोक जनशक्ती पार्टी प्रत्यक्षात पाच जागांवर लढलेली असताना एक्झिट पोलमध्ये तो पक्ष सहा जागा जिंकू शकेल, असे ठोकून दिले आहे. झारखंडमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकच जागा लढवत असताना त्या पक्षाला तीन ठिकाणी विजय मिळेल, असा ‘चमत्कार’ एक्झिट पोलवाल्यांनी केला आहे. हा सर्व आकड्यांचा बनावट खेळ असल्याचेही नमूद केले आहे.





