Satara : पुसेगावला जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन होणार आहे. यात दोन जानेवारीला नोंदणी, तीन जानेवारीला बक्षीसपात्र जनावरांची निवड व चार जानेवारीला बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे. राज्यातील खिलारप्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.
खिलारच्या उपजातीनुसार खिलार काजळी बैल गट, खिलार काजळी गाय गट, खिलार कोसा बैल गट, खिलार कोसा गाय गट या चार मुख्य गटांत ही स्पर्धा होईल. प्रत्येक गटात जुळीक, सहा दाती, चार दाती, दोन दाती, आदत (वर्षावरील), आदत (वर्षाखालील) असे वयोमानानुसार सहा उपगट तयार केले आहेत. प्रत्येक उपगटात निवड झालेल्या प्रथम चार क्रमांकांच्या विजेत्या जनावरांच्या मालकांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. चारही मुख्य गटातील चॅम्पियन जनावरांच्या मालकाला प्रत्येकी २५ हजार रुपये व श्री सेवागिरी चषक देण्यात येईल.
सातारा-पंढरपूर रस्त्यावरील यात्रा स्थळावर हे प्रदर्शन होईल. स्पर्धा फक्त खिलार जनावरांच्या होतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एखाद्या गटातील क्रमांक विभागून दिल्यास बक्षीसाची रक्कम विभागून दिली जाईल. जनावरांची नोंदणी करताना मालकाचे आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत असणे आवश्यक आहे. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने विशेष परिश्रम घेत आहेत.
कर्नाटक व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जातिवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम तीन जानेवारीला पुसेगावमध्ये रंगणार आहे. प्रदर्शनात देखणी व जातिवंत जनावरे प्रत्यक्षात पाहण्याची पर्वणी खिलारप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
– डॉ. सुरेश जाधव (अध्यक्ष, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट)





