पुणे | गुरूपौर्णिमेमुळे फुलबाजारात उत्साह

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुरूपूजनाचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा गुरूपौर्णिमा उत्सव रविवारी आहे. या दिवशी कित्येक लोक दर्शनासाठी मंदिरामध्ये जातात. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१९) फुलबाजारात उत्साह संचारला होता. फुलांची आवक वाढली आहे.
त्या तुलनेत मागणीही जास्त आहे. दोन दिवसांच्या तुलनेत फुलांच्या भावामध्ये घाऊक बाजारात १० ते २० टक्के वाढ झाल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
मार्केट यार्डात जिल्ह्यासह सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतून फुलांची आवक होत आहे. गुरूपौर्णिमेसाठी सजावट आणि हार तयार करण्यासाठी लागणाऱ्या फुलांना जास्त मागणी असते. त्यामुळे शेतकरी माल राखून ठेवतो. या वेळेला आवक वाढत असते. त्यानुसार यंदाही वाढली आहे. शहर, उपनगरांसह परगावांहून आलेल्या खरेदीदारांकडून फुलांची खरेदी करण्यात येत होती.
दर्जेदार फुलांना मागणी
जिल्ह्यासह पुणे विभागात पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भिजलेल्या आणि दर्जाहिन मालाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, ग्राहकांकडून दर्जेदार आणि सुक्या मालाला मागणी आहे.
दर्जेदार मालाला अधिक भाव मिळत आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्रामससह विविध समाज माध्यमांच्या काळात फुलांची क्रेझ कमी झालेली नाही. फुलांना चांगली मागणी आहे. आवकही वाढली आहे.- सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड.
फुलाचे प्रकार घाऊक बाजारातील किलोचे दर्जानुसार भाव
साधा गुलाब ३० ते ६० रु.
डच्च गुलाब ८० ते १५० रु.
गुलझडी २०० ते २५० रु.
झेंडू ५० ते १०० रु.
शेवंती १०० ते २५० रु.
अॅस्टर १५० ते २५० रु.


