माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला; अजित पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Ajit Pawar : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली. या यशानंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
या निवडणुकीसाठी तब्बल ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ब वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक ७९ उमेदवारी अर्ज पणदरे आणि बारामती गटातून दाखल झाले आहेत. मंगळवार, २८ मे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. अजित पवार यांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीची उत्कंठा वाढली आहे. मात्र, ते आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
‘छत्रपती’वर एकहाती सत्ता
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहात्ती सत्ता आणली. राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.





