Nagpur Airport : नागपूर विमानतळावर खळबळ ! इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, बॉम्ब धमकीमुळे पळापळ

नागपूर : कोच्चीहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगो विमानाला (फ्लाइट नं. 6E 2706) मंगळवारी (17 जून 2025) दुपारी बॉम्ब धमकीच्या भीतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक इमर्जन्सी लँडिंग करावी लागली.
या घटनेमुळे विमानतळावर काही वेळ गोंधळ आणि पळापळीचे चित्र निर्माण झाले. विमान सकाळी 9.20 वाजता कोचीहून उड्डाण करून दुपारी 12.35 वाजता दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, मध्यंतरी धोक्याचा इशारा मिळाल्याने ते नागपुरात वळवण्यात आले. सध्या विमानाची कसून तपासणी सुरू असून, पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
धमकीनंतर तातडीची कारवाई
विमानातील अधिकाऱ्यांना धोक्याची माहिती मिळताच कोची विमानतळाने आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केले आणि सुरक्षा एजन्सींशी समन्वय साधला. विमानाचे लँडिंग झाल्यावर सर्व 181 प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही, पण पोलीस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू ठेवला आहे. याआधीही विमानात बॉम्ब असल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत, पण त्यातून ठोस पुरावा आढळला नव्हता. तरीही या प्रकरणात कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
सुरक्षा व्यवस्था कडक
नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, इतर विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगवरही लक्ष ठेवले जात आहे. धमकीच्या मागील सत्यता आणि हेतू याबाबत तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्टता येईल. सध्या सर्वांचे लक्ष पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाच्या तपासाकडे लागले आहे. ही घटना गुजरातमधील नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेनंतर घडल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
विमानतळ सुरक्षिततेचा प्रश्न
दरम्यान, नागपूर विमानतळाला आणखी एक गंभीर आव्हान समोर आहे. विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उंचीच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या 181 इमारती विमानतळाच्या 25 किलोमीटर परिघात असल्याचे उघड झाले आहे. या अडथळ्यांमुळे उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरीही याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ज्यामुळे विमानतळ प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.





