Beed News : बीडमध्ये पुन्हा खळबळ! गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू

Beed News – बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याचा राजकीय स्तरावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले.
तसेच, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, पालकमंत्री म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, तरीही अद्याप या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचे अद्याप समोर आलेले दिसत नाही, अशी टीका विरोधकांनी पुन्हा एकदा केली आहे. शुक्रवारी (23 मे) पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोर आले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेसंदर्भात माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या गोळीबारात एका चोरट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अद्यापही याबाबत पोलिसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही. तसेच, सुरक्षारक्षकाने नेमका गोळीबार का केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून काय अधिकृत माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





