माजी सैनिक पत्नीच्या फसवणुक प्रकरणात शिरुर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याची लुडबुड सुरुच?

निमोणे : करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी रेश्मा राहुल वाळके (वय ३७, रा. करडे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात २७ जानेवारी रोजी फिर्याद दाखल केली आहे. मात्र, २२ दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही.
याबाबत तालुक्यातील माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी शिरुरचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांची भेट घेत फरार आरोपीना तातडीने अटक करावी, अन्यथा माजी सैनिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याने माजी सैनिकांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांची भेट घेतली होती.
तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनीही या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घातलेले असतानाही शिरुर पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारीच आरोपीच्या संपर्कात राहुन त्यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोप करत माजी सैनिक पत्नीने पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे या अधिकाऱ्याची लेखी तक्रार केली आहे. असं असतानाही आरोपीना मदत करणाऱ्या झारीतील शुक्राचार्य असणाऱ्या या अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
२२ दिवस उलटुनही आरोपी फरारच?
करडे येथील माजी सैनिक पत्नीची आर्थिक फसवणुक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर माजी सैनिक आणि त्याच्या पत्नीने २७ जानेवारी २०२५ रोजी शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर २२ दिवस उलटूनही यातील एकही आरोपी पोलिसांना सापडला नाही. शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके हे आरोपीचा कसुन तपास करत आहेत. परंतु याचं पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारी आरोपीच्या संपर्कात राहत त्यांना मदत करत आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटाचे कथानक शोभेल अशीच काहीशी सध्या या तपासाची अवस्था झालेली आहे.





