Assam Politics: आसामच्या राजकारणात भूकंप! भूपेन बोरा 22 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार; मुख्यमंत्री सरमांचा मोठा दावा
Assam Politics:

Assam Politics: आसाममध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा येत्या २२ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून बोरांच्या घरी भेट –
मंगळवारी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीतील घोरामारा भागात असलेल्या भूपेन बोरा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी बोरा यांच्या पत्नी आणि मुलाने मुख्यमंत्र्यांचे औक्षण करून स्वागत केले. विशेष म्हणजे, बोरा यांनी एक दिवसापूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र नंतर त्यांनी तो मागे घेतला होता. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरमा यांनी बोरांच्या भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली.
‘काँग्रेस आता हिंदूंचा विचार करणारा मंच राहिला नाही’ –
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “भूपेन बोरा यांनी ३२ वर्षे काँग्रेसमध्ये संघर्ष केला, परंतु त्यांना योग्य संधी मिळाली नाही. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे हा संदेश जाईल की काँग्रेस आता हिंदूंसाठी आणि मुख्य प्रवाहातील आसामी लोकांसाठी योग्य मंच राहिलेला नाही. भाजपमध्ये त्यांना आपले विचार मांडण्यासाठी आणि काम करण्यासाठी अधिक चांगली संधी मिळेल.”
अनेक बडे नेतेही भाजपच्या वाटेवर –
मुख्यमंत्री सरमा यांनी असाही दावा केला आहे की, केवळ भूपेन बोराच नव्हे तर त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते गुवाहाटी आणि नॉर्थ लखीमपुर येथे भाजपचे कमळ हाती घेतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांनी बोरांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असून, प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करणार आहेत.
काँग्रेसचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू –
दुसरीकडे, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप भूपेन बोरा यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. पक्षश्रेष्ठींकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोरा यांनीही आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी थोडा वेळ मागितल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यामुळे बोरा यांचा भाजप प्रवेश आता केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे.





