Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहे. याप्रकरणी नागरिकही नाराजी व्यक्त करत आहे. पुण्यातील वारजे येथील कै.शामराव श्रीपती बराटे विद्यालय मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळ थांबली होती. मात्र काही वेळातच वीजपुरवठा सुरू झाला आणि मतदान प्रक्रिया ही सुरू झाली. तर नारायण पेठेत गोगटे शाळेत मशीन काहीवेळ बंद होते. साडेसात वाजता येथे मतदानाला सुरुवात झाली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी. आर हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक १६९ मधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदार ताटकळत उभे राहावे लागत आहे. याशिवाय कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. जळगाव जामोद मतदारसंघातील मनसगावात मतदान यंत्रात बिघाड झाल्याने तेथे काही वेळ मतदान थांबले. Maharashtra Assembly Election 2024| छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील २२६ केंद्रावरील ईव्हीएम मशीन गेल्या एका तासापासून बंद पडले आहे. यामुळे प्रशासनाकडून मशीन बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांची मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. तर मालेगाव विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक २९२ या ठिकाणी असलेले ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार वैतागल्याचे पाहायला मिळाले. Maharashtra Assembly Election 2024 | हेही वाचा: अक्षय कुमार, सोनाली कुलकर्णीसह अनेक कलाकार मंडळींनी बजावला मतदानाचा अधिकार