कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत सबकुछ राष्ट्रवादी

14 जागा पटकाविल्या : एक अपक्ष उमेदवार विजयी तर कॉंग्रेसला एक जागा
पुणे – संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणूकीत 16 पैकी 14 जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा दूध संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर एक कॉंग्रेसचे उमेदवार तर एक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा बॅंकेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसने दूध संघावर सुद्धा एकहाती सत्ता मिळविली आहे. या निकालाने राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहकारावरील पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
निकालानंतर विजयी संचालक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
जिल्हा दूध संघासाठी रविवारी (दि.20) रोजी मतदान झाले. सोमवारी सकाळी कात्रज मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरुवात झाली.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. जिल्हा दूध संघातील 16 पैकी राष्ट्रवादीचे 5 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये गोपाळराव म्हस्के (हवेली), भगवान पासलकर (वेल्हे), राहूल दिवेकर (दौंड) आणि अनुसुचित जाती-जमाती गटातून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप हे कॉंग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनाही सहकार पॅनलने पुरस्कृत केले होते.
सुरुवातीला पुणे जिल्हा दूध संघाच्या पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. तेथील सर्व उमदेवार हे राष्ट्रवादीचे आहेत. तसेच अपक्ष निवडून आलेलेउमेदवार हे दिलीप थोपटे होते. त्यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठींबा दिला आहे. निवडून आलेले बाळासाहेब नेवाळे हे जरी भाजपाचे असले तर ते राष्ट्रवादी पुरस्कृत निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वच जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व मिळविले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
विजयी उमेदवार
आंबेगाव- विष्णु हिंगे, भोर- दिलीप थोपटे, खेड – अरुण चांभारे, जुन्नर- बाळासाहेब खिलारी, मावळ- बाळासाहेब नेवाळे, मुळशी- कालिदास गोपाळघरे, शिरुर- स्वप्नील ढमढेरे, महिला प्रतिनिधी केशरताई पवार (शिरूर), लता गोपाळे, इतर मागासवर्ग प्रवर्ग- भाऊ देवाडे (जुन्नर), भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ निखिल तांबे.





