मुंबई : राज्यात बोगस रेशन कार्ड शोधमोहीम १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. ३१ मेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या काळात रेशन कार्डधारकांच्या घरीही भेट दिली जाणार आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. याबाबतचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाईल. जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती तात्काळ रद्द केली जाणार आहेत. दरवर्षी अशी मोहीम राबविली जाणार आहे. राज्यातील प्रत्येक रेशन कार्डची तपासणी होणार आहे. रेशन कार्डधारकांना त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांकडून तपासणी नमुना फॉर्म विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. तो फॉर्म पुन्हा भरून द्यावा लागणार आहे. या फॉर्मसह कार्डधारकांना हमीपत्रही द्यावे लागणार आहे. हमीपत्रासह फॉर्म दुकानदारांकडे सादर केल्यानंतर ग्राहकाला त्याची पोच मिळणार आहे. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल, त्यांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. पुरावा सादर न केल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील, एका कुटुंबात दोन कार्डे दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाईल. रेशन कार्डधारक त्या भागात राहत असल्याबाबत भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, ओळखपत्र (कार्यालयीन) गॅस जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, वीज बिल, टेलिफोन, मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी एक पुरावा द्यावा लागणार आहे. हा पुरावा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील, खासगी कंपन्यांतील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका असेल, तर ती शिधापत्रिका तत्काळ रद्द केली जाणार आहे. त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य शिधापत्रिका दिली जाणार आहे, असे निर्धारीत करण्यात आले आहे. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मृत व्यक्तींना लाभार्थीच्या यादीतून वगळले जाणार आहे.