हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी होईल – एअर मार्शल चौधरी

हैदराबाद, – तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची तिन्ही सेनादलांच्या पथकाकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू आहे. आणि ही चौकशी प्रत्येक पैलू लक्षात घेऊन केली जात आहे अशी माहिती एअर चिफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दिली आहे.
आज येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, या चौकशीला आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊन मी त्या चौकशीच्या कामावर प्रभाव टाकू इच्छित नाही, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कोठे काय चुकले हे तपासण्याबरोबरच काही योग्य त्या शिफारशी करण्याचीही सूचना या चौकशी पथकाला करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक अँगल लक्षात घेऊन ही चौकशी केली जात आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या दुर्घटनेत जनरल बिपीन रावत यांच्यासह एकूण तेरा जणांचे निधन झाले आहे. या चौकशी संबंधात मी कोणतीही घोषणा करणार नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अत्यंत तंत्रशुद्धपणे ही चौकशी सुरू असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.





