Sonali Bendre: “कर्करोग झालाय हे उशिरा समजलं… आणि आजही त्याची भीती वाटते”, अशा शब्दांत अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अभिनयातील आपल्या नैसर्गिक शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोनाली अलीकडे मुंबईत झालेल्या ‘RoboGynIndia 2025’ या वैद्यकीय परिषदेत सहभागी झाली होती. स्त्रीरोगशास्त्रातील रोबोटिक सर्जरीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात तिने तिच्या वैयक्तिक कर्करोग प्रवासावर मोकळेपणाने भाष्य केलं. सोनाली बेंद्रे म्हणाली, “जेव्हा मला कर्करोगाचं निदान झालं होतं, तेव्हा लोक यावर उघडपणे बोलत नव्हते. ‘C’ असं म्हणत थेट उल्लेख टाळायचे. पण जेव्हा मी माझा अनुभव शेअर केला, तेव्हा अनेकांनी मला सांगितलं की, तेही याच परिस्थितीतून जात आहेत.” तिच्या या स्पष्ट भाष्यामुळे अनेकांना धीर मिळाला. “कर्करोग झाला म्हणून मी दोषी नाही, मग मी तो लपवून का ठेवायचा?” असा ठाम सवाल करत सोनालीने समाजातील ‘कर्करोग’ या आजाराविषयीची भीती आणि संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, “आता लोक ‘C’ न म्हणता सरळ ‘कर्करोग’ म्हणतात, ही मानसिकतेतील मोठी बदलाची नांदी आहे.” मात्र या लढाईत आजही एक सततची भीती तिच्यासोबत आहे. सोनालीने स्पष्ट केलं की, “कर्करोग पुन्हा होण्याची भीती अजूनही आहेच, मी ते नाकारणार नाही. पण मी नियमित स्कॅन करून घेते, आरोग्याची विशेष काळजी घेते.” तिने यावेळी अजून एक कबुली दिली की, “माझ्या बाबतीत कर्करोगाची चौथी स्टेज झाल्यावर याची माहिती मिळाली होती, त्यामुळे वेळेचं निदान किती महत्त्वाचं आहे हे मला जाणवलं.” या कार्यक्रमात सोनाली बेंद्रेने केवळ तिच्या अनुभवाची मांडणी केली नाही, तर आरोग्याविषयी जागरूक राहण्याचा संदेशही दिला. दरम्यान, ती सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या कलर्स वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालिका म्हणून झळकत आहे. तिच्यासोबत मुनव्वर फारुकी याचीही झलक पाहायला मिळत असून, विविध टेलीव्हिजन सेलिब्रिटी कपल्स या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.