नवी दिल्ली : अहमदाबादमधील एलजी महाविद्यालयाचे नाव लवकरच बदलून ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ असे ठेवण्यात येणार आहे. अहमदाबाद महानगर पालिकेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. परंतु, आता विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध तर सुरूच केला आहे तसेच पंतप्रधानांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री केटी रामा राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून या दोघांना लक्ष्य केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये, “निर्मला सीतारामन यांना शक्य झालं तर त्या भारतीय रिझर्व्ह बँकेला, नोटांवरही महात्मा गांधीजींच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याचे आदेश देतील.
LG medical college in Ahmedabad renamed as Narendra Modi medical college!
Already Sardar Patel stadium has been renamed as Narendra Modi stadium
If FM Nirmala Ji has her way, RBI may soon be ordered to print new currency notes where Mahatma Gandhi Ji will be replaced by Modi Ji
— KTR (@KTRTRS) September 16, 2022
केटी रामा राव यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “अहमदाबादमधील एलजी महाविद्यालयाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ असे ठेवण्यात आले आहे. याआधी सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ ठेवण्यात आले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शक्य झालं तर त्या लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेला आदेश देऊन नवीन नोटांवर महात्मा गांधीजींच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यास सांगतील.” असे म्हटले आहे.
हे पहिल्यांदाच नाही की एखाद्या संस्थेला किंवा जागेला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी अहमदाबाद स्टेडियमचे नावही ‘नरेंद्र मोदी स्टेडिअम’ असे ठेवण्यात आले होते. या स्टेडियमचे नाव आधी ‘सरदार पटेल स्टेडियम’ असे ठेवण्यात आले होते. दरम्यान, या नामांतरावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच टीकास्त्र उगारले आहे.