पुणे जिल्हा | भोरमधेही आता ड्रोनच्या घिरट्या

भोर, (प्रतिनिधी) – मागील चार ते पाच वर्षांपासून फक्त लग्न समारंभात दिसणारा ड्रोन आठ दिवसांपासून भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील परिसरात रात्रीच्या वेळी घिरट्या घालत आहे. साधारणतः चार ते पाच तास ड्रोन ठीक ठिकाणच्या गावांवर फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
भोर तालुक्याचे दक्षिणेकडील वीसगावच्या धावडी, पळसोशी, वरवडी, पाले तर, चाळीसगाव खोऱ्यातील आंबवडे, कारी, टिटेघर, कर्णावड, करंजे ता. भोर येथील परिसरात आठ दिवसांपासून रात्री १० वाजले नंतर ड्रोन घिरट्या घालत आहे.
यापूर्वी कधीही ड्रोन रात्रीच्या वेळी परिसरात फिरत नव्हता. अचानक ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्या आहेत का आणि कशासाठी ड्रोन येथील परिसरात घिरट्या घालत आहे.
याचा उलगडा नागरिकांना होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. तरुण वर्ग घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर लक्ष देत आहे. मात्र, ड्रोन फक्त घिरट्या घालताना दिसत आहे.
रात्रीच्या एक वाजेपर्यंत ड्रोनच्या घिरट्या सुरूच असतात. ड्रोन परिसरात फिरत असल्याची कल्पना रात्रगस्त घालणाऱ्या भोर पोलिसांना देण्यात आली आहे.
ड्रोन वरवडी, आंबवडे परिसरात फिरत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही त्या परिसरातील गावोगावच्या पोलीस पाटलांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
लवकरच ड्रोन कोणाचे आणि का रात्रीच्या वेळी फिरत आहेत याची माहिती घेऊन ड्रोन फिरवणारांवर कारवाई करणार आहोत, असे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी सांगितले.





