Delhi : राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीतही भाजपचे धक्कातंत्र? पक्षाच्या अंतर्गत चर्चांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा? वाचा….

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यांत ही घोषणा होऊ शकते असे सांगितले जात आहे. 12 राज्यांमध्ये पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या असून 15 मार्चपूर्वी नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते. आता भाजपा कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तसेच या वेळीही धक्कातंत्राचा वापर करुनच एखादे नाव समोर येते का? हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदांसाठीच्या संभाव्य नावांची यादी प्रभारींकडून यापूर्वीच मागविण्यात आली आहे. त्यानुसार या नावांवर पक्षात चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेत नवा अध्यक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह (आरएसएस) पक्षाच्या सर्व घटकांना मान्य असावा यावर एकमत करून निवड केली जाणार आहे. त्याला संघटनात्मक मूल्यांची सखोल माहिती असावी. शिवाय, पक्ष जाती संतुलन, भाषा विवाद, सीमांकन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशमधील पक्षाचा पाया मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल. कारण लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात झालेल्या पराभवामुळे पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्यापासून वंचित रहावे लागले होते.
जेपी नड्डांचा कार्यकाळ
जेपी नड्डा यांनी 2019 मध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. जानेवारी 2020 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. नड्डा यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्यात आला होता. ते सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पक्ष आपल्या नवीन अध्यक्षासाठी संभाव्य उमेदवारांचा विचार करत आहे.





