नात्यांच्या गर्दीतही ‘अभागी’ अन् एकटीही…

लॉकडाऊनमध्ये हरवलेली विशेष मुलगी सापडली, पण आता पालकत्त्व स्वीकारायलाच कोणी तयार नाही
“कर्तव्य’ सामाजिक संस्थेमुळे सापडला पत्ता, नातलगांनी मात्र जबाबदारीतून हात झटकले
पुणे – लॉकडाऊन काळात हरवलेली विशेष मुलगी सहा-सात महिन्यांनी सापडली खरी; परंतु तिचे पालकत्त्वच स्वीकारायला कोणी तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आई “सेक्सवर्कर’, भाऊ पेंटिंगची कामे करतो, नातेवाईकांचे विशेष लक्ष नाही अशी परिस्थिती असल्याने तिचे पालकत्त्व कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तिची तात्पुरती जबाबदारी “कर्तव्य’या संस्थेने घेतली आहे.
विशेष मुलगी असलेल्या 18 वर्षीय रुकसानाला (नाव बदललेले आहे) सांभाळणे आईला शक्य नव्हते. तिच्यावर कोणताही प्रसंग ओढवू शकतो, म्हणून तिने सांभाळ करण्यासाठी रुकसानाला नातलगांकडे ठेवले. लॉकडाऊनच्या काळात रुकसाना घराबाहेर पडली. त्यानंतर तिचा शोध घेतला; परंतु ती सापडलीच नाही.
औपचारिकता म्हणून नातलगांनी “मिसिंग’ची तक्रार दाखल केली. या आधीही ती अशीच घरातून निघून गेली होती. मात्र, यावेळी पाच-सहा महिने झाले तरी सापडली नाही म्हणून आईने “कर्तव्य’ संस्थेच्या उपाध्यक्षा अलका गुजनाळ यांना तिचा फोटो दिला आणि शोधण्याची विनंती केली.
काही दिवसांपूर्वी संस्थेच्या कार्यालयात येरवडा मनोरुग्णालयातून गुजनाळ यांना फोन आला की, “दोन विशेष स्त्रिया बऱ्या झाल्या असून, त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम आहे,’ त्यावेळी त्या कार्यक्रमास गेल्या. तेथील महिलांच्या गर्दीत त्यांना रुग्णालयाच्या गणवेशातील मुलगी दिसली.
चेहरा ओळखीचा वाटला, तेव्हा त्यांनी पर्समधून फोटो काढला, तर योगायोगाने ती रुकसानाच होती. मार्केट यार्ड पोलिसांना ती रस्त्यावर फिरत असताना आढळली. विशेष असल्याने तिला एका संस्थेमार्फत येरवडा मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती जेव्हा सापडली तेव्हा फोटो आणि माहिती पाहिल्यानंतर ती रुकसानाच असल्याची खात्री त्यांना पटली.
आईची हतबलता…
रुकसाना सापडल्याची बातमी तिच्या आईला कळवण्यात आली. मात्र, तिचे पालकत्त्व स्वीकारायला आई तयार नाही. वयही 45-46 असल्याने तिच्या स्वत:च्याच उपजीविकेचा प्रश्न मोठा आहे. त्यातून या मुलीचा सांभाळ करण्याची तिची आर्थिक ताकद नाही. 18 वर्षे पूर्ण झाल्यामुळे तिला कोणत्याही संस्थेत दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे मुलगी सापडल्याची चिंता मिटली; परंतु तिचे पालकत्त्वच घेणारे कोणी नाही, अशी स्थिती आहे.





