“पक्ष सोडून गेलेले परत आले तरी…”; उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका; पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले हे महत्वाचे आदेश

Uddhav Thackeray : येत्या काही महिन्यांवर आगामी महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मातोश्रीवर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही. मात्र, जो पडत्या काळात पक्षासोबत राहिला त्याला शंभर टक्के साथ मिळेल, असं उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
यामुळे उबाठाने आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबरी कसली असून मुंबईसह अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली येथे तयारीला सुरूवात केली आहे. येथील पदाधिकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत भाष्य केलं. मनसेसोबत चर्चा सुरू असून आम्ही लवकरच युतीचा निर्णय घेऊ, असं ठाकरेंनी सांगितल्याची माहिती आहे.
हवेदावे विसरून तयारीला लागा. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा. आपल्यासोबत जो येईल त्याला शंभर टक्के साथ द्या. मतदानाच्या दिवशी कुठेही दुबार मतदान होणार नाही याकडे लक्ष द्या, असे महत्वाचे आदेश उद्धव ठाकरेंनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एका जागेसाठी अनेक अचूक असतात त्यामुळे तिकीट कुणालाही मिळेल तरी प्रत्येकीने मत्सर म्हणून नव्हे तर पक्ष म्हणून लढा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा : Surya Grahan 2025: 21 सप्टेंबरला होणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; वृषभ, सिंह आणि तूळ राशीला विशेष लाभ





