तरी “ते” पक्ष सोडतायत, त्याला मी काय करू शकतो ? राहुल गांधींनी व्यक्त केली राऊतांकडे खंत

नवी दिल्ली – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अलीकडेच दिल्लीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेचा सारा तपशील आज राऊत यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील स्तंभातून सादर केला आहे. कॉंग्रेसला संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असले तरी राहुल आणि प्रियांका हे पक्षाच्या पुनरूज्जीवनासाठी कसोशिचे प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांच्या विषयीचे कौतुकगोद्गारही यात काढण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉंग्रेस सोडून जात असल्याविषयी विचारले असता राहुल गांधी म्हणाले की पक्षातील जुन्या ज्येष्ठ नेत्यांना कॉंग्रेसने खुप काहीं दिले आहे; आज त्यांची पक्षाला गरज असताना ते पक्ष सोडून जात आहेत त्याला मी काय करू शकतो असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या कामाविषयी आम्ही अंतर्गत सर्व्हे केला त्यावेळी जे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नव्हते त्यांनाही अमरिंदरसिंग यांच्या पेक्षा जादा मते मिळाल्याचे राहुल गांधी यांनी निदर्शनाला आणून दिले.
अमरिंदरसिंग यांना केवळ सहा टक्के मते मिळाली होती. त्यांना काही तरी करा असे आम्ही सांगितले पण ते बदलाला तयारच नव्हते. त्यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले असते तर पंजाबात कॉंग्रेस संपली असती असे राहुल गांधी यांनी राऊत यांच्याशी बोलताना नमूद केले.
गुलामनबी आझाद यांच्या संबंधात बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की त्यांची राज्यसभेच्या नेतेपदाची मुदत संपल्यानंतर आम्ही त्यांना जम्मू काश्मीरच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याची सुचना केली, त्यावेळी गुलामनबी आझाद यांनी त्यास नकार दिला. त्या राज्यात कॉंग्रेसच अस्तित्वात नाही असे गुलामनबींनी सांगितले.
ज्या राज्याचे मुख्यमंत्रीपद आझाद यांनी भोगले आहे तेथे कॉंग्रेस अस्तित्वात नाही असे जर तेच म्हणत असतील तर मी काय करू शकतो अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्याशी बोलताना व्यथा मांडली असे ते म्हणाले.
प्रियांकांच्या पतीला एका दिवसात 69 नोटिसा
या सदरात संजय राऊत यांनी प्रियांका गांधींशीही झालेल्या चर्चेचा तपशील दिला आहे. महाराष्ट्र आणि बंगाल मध्ये ईडी, सीबीआय, अशा सरकारी यंत्रणा विरोधकांच्या मागे लावल्या गेल्या आहेत असे राऊत यांनी प्रियाकांच्या निदर्शनाला आणून दिले असता, प्रियाकां म्हणाल्या की महाराष्ट्र, बंगाल काय घेऊन बसलात, मी आणि माझे कुटुंबियही त्याच चक्रातून जात आहोत.
मी लखीमपुर खिरीला जाताच माझ्या पतीवर एकाच दिवसात आयकर विभागाच्या तब्बल 69 नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पण मी मागे हटणार नाही मी लढत राहणार असे प्रियांकांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेशात आमच्या जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांनाहीं खोट्या खटल्यात अडकवले जात असल्याची माहितीही प्रियांकांनी यावेळी सांगितल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधींचे सरकारी घर मोदी सरकारने काढून घेतले आहे त्या आता कोठे राहतात असे विचारता प्रियांकांनी सांगितले की सध्या मी आणि माझे कुटुंब खान मार्केट जवळील एका इमारतीत राहतो. पण तेथे लोकांना भेटणे शक्य होत नाही म्हणून मी 10 जनपथ या सोनियांच्या निवासस्थानी लोकांना भेटते असे त्या म्हणाल्याचेही राऊत यांनी नमूद केले आहे.





