Yogi Adityanath : प्रदूषण वाढलं, तरी ते कमी होईल.. मग एवढी चिंता कशाला? फटाके फोडले ते योग्यच.! CM योगी यांचं विधान चर्चेत
योगी आदित्यनाथ यांनी केवळ प्रदूषणाच्या मुद्द्यावरच प्रतिक्रिया दिली नाही, तर दिवाळीत फटाके फोडणाऱ्या नागरिकांचं समर्थनही केलं. लोकांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली आणि भरपूर फटाके फोडले, ते योग्यच केलं, असं त्यांनी म्हटलं.

Yogi Adityanath : दिवाळीत फटाके फोडायचे की नाही, यावरून देशभरात प्रदूषणाची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट फटाक्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांची हवा प्रदूषणामुळे बिघडलेली असताना योगींनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
‘दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषण वाढलं असेल, पण ते कालांतराने कमी होईल. मग एवढी चिंता कशाला?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, दिवाळीत फटाके फोडण्यावर आपल्या सरकारने कोणतेही निर्बंध लादले नव्हते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकीकडे प्रदूषणाचा वाढता धोका आणि दुसरीकडे सण साजरा करण्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
‘फटाक्यांमुळे प्रदूषणाची चर्चा, मग भ्रष्टाचारावर गप्प का?’ योगींचा सवाल
एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून टीकाकारांना लक्ष्य केलं. दिवाळीसारखा सण उत्साहात साजरा करताना लोकांनी फटाके फोडले की लगेच प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र, संपूर्ण व्यवस्थेला भ्रष्टाचाराने पोखरणाऱ्यांना कोणी जाब विचारत नाही, अशी टीका त्यांनी केली.
‘तुम्हीही दिवाळी साजरी केली. मात्र, अनेकांनी त्यामुळे प्रदूषण झाल्याची तक्रार केली. प्रदूषण वाढलं असेल, तरी ते कालांतराने कमी होईल. मग एवढी चिंता कशाला?’ असं योगी म्हणाले.
पुढे त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत, जनतेने वर्षातून एक दिवस फटाके फोडून दिवाळी साजरी केली तर त्यावरून मोठा गदारोळ केला जातो; मात्र व्यवस्थेला भ्रष्टाचाराने प्रदूषित करणाऱ्यांना प्रश्न विचारले जात नाहीत, असं म्हटलं.
‘लोकांनी भरपूर फटाके फोडले, ते योग्यच’; सरकारच्या भूमिकेवरही भाष्य
योगी आदित्यनाथ यांनी केवळ प्रदूषणाच्या मुद्द्यावरच प्रतिक्रिया दिली नाही, तर दिवाळीत फटाके फोडणाऱ्या नागरिकांचं समर्थनही केलं. लोकांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली आणि भरपूर फटाके फोडले, ते योग्यच केलं, असं त्यांनी म्हटलं. आपल्या सरकारने दिवाळीत फटाक्यांवर कोणतेही निर्बंध नसतील, असं स्पष्ट केलं होतं, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे योगींच्या या वक्तव्याकडे केवळ राजकीय विधान म्हणून नव्हे, तर प्रदूषण नियंत्रण आणि सणांच्या परंपरेबाबतच्या भूमिकेच्या दृष्टीनेही पाहिलं जात आहे.
लखनऊ, वाराणसी, गोरखपूरमध्येही प्रदूषणाचा विळखा
दिल्लीपुरतीच प्रदूषणाची समस्या मर्यादित राहिली नाही. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही हवेची गुणवत्ता खालावली. लखनऊचा AQI २४५, वाराणसीचा २७४, तर गोरखपूरचा २६१ नोंदवण्यात आला. या तिन्ही शहरांमध्ये हवा ‘खराब’ श्रेणीत होती.
दरम्यान, प्रदूषण वाढण्यामागे केवळ फटाकेच नव्हे, तर वाहनांचा धूर, इतर उत्सर्जन आणि प्रतिकूल हवामान यांचाही वाटा असतो. मात्र, दिवाळीनंतर फटाक्यांच्या वापरामुळे प्रदूषणात झालेली वाढ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.





