‘अर्णवच्या केसालाही धक्का लागला तर…’

मुंबई – आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यांना रविवारी अलिबागच्या कारागृहातून नव्या मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. अर्णव यांच्या समर्थनार्थ भाजपा नेते उतरले आहेत.
भाजपचे आमदार राम कदम अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यास तळोजा कारागृहाकडे रवाना झाले आहेत. याआधी त्यांनी एका ट्विट करत महाविकास आघाडीला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले कि, अर्णव यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्यासाठी महाविकास आघाडी जबाबदार राहील. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही क्षमा करणार नाही. तुम्ही सक्तीने आणीबाणी लागू केली आहे. मी अर्णवजींना भेटण्यास निघालो आहे. हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हानच राम कदम यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.
#Arnab जी के जान को ख़तरा है . उनके सर के बाल को भी धक्का लगा उसका ज़िम्मेदार #MVA होगी @OfficeofUT @AnilDeshmukhNCP जी आपको देश कीं जनता कभी माफ़ नहीं करेगी आपने जबरन आपातकाल थोपा है . मै निकला हूँ मेरे घरसे #Arnab जी को तलोज़ा जेल में मिलने के लिए . हिम्मत है तो रोक के दिखाओ
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 9, 2020
दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अलिबाग येथील कारागृहात असताना मोबाईल फोनचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांची तेथून अन्यत्र रवानगी करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे तरीही त्यांच्याकडे दुसरा मोबाईल कोठून आला याची चौकशी केली जात आहे.
अलिबागहून त्यांना तळोजाला हलवले जात असताना त्यांनी पोलिस व्हॅन मधून जोरदार आरडाओरड केली व मारहाण झाल्याचा मोठाच कांगावा केला. आपल्याला पत्नीशी व वकिलाशी बोलू दिले नाहीं अशी तक्रारही त्यांनी केली.
गोस्वामी यांना अलिबागला कारागृहाच्या कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंतरीम जामीनावर मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी निर्णय दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





