Asad Qazi : वयाच्या सत्तरीतही जिद्दीने मिळविले यश; महाडचे असद काझी झाले दहावी परीक्षा उत्तीर्ण

Asad Qazi : शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर वय आणि आर्थिक स्थिती कधीही अडथळा ठरू शकत नाही. एखादी व्यक्ती त्याला पाहिजे तेव्हा, कोणत्याही वयात शिक्षणाला सुरुवात करु शकते. शिकण्याची तळमळ आणि धैर्य हवे, हे खरे असल्याचे सिद्ध करून महाड शहरातील असद काझी यांनी वयाच्या सत्तरव्या वर्षी दहावीत प्रवेश केला आणि सतत मेहनत, समर्पण आणि दृढनिश्चयाने ५९ टक्के गुण मिळवले आहेत.
असद काझी यांनी केवळ त्यांच्या वयाच्या लोकांसाठीच नाही तर तरुणांसमोरही उत्तम उदाहरण ठेवले आहे. विद्यार्थ्यांसाठी जे काही कारणास्तव आपल्या या जिद्दीची कहाणी काझी यांनी सांगितली आहे.
ते म्हणाले, हिंमत हारू नका, प्रयत्न करत राहा, देवाची इच्छा आहे, यश नक्की मिळेल आणि भविष्य उज्ज्वल असेल असा संदेश त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला आहे. शाळेचे एओ आसिफ पल्लवकर, मुख्याध्यापक खान खालिद, जावेद पानसारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी असद काझीचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
तसेच त्यांच्या जिद्दी पूर्ण भावनेचे कौतुक केले. महाड शहरासह तालुक्यातील अनेक शिक्षणप्रेमी संस्थांमधील तसेच शिक्षणप्रवीण नागरिकांनी असद काझी यांचे त्यांच्या या शिक्षणाच्या असिम प्रेमाबद्दल कौतुक केले आहे.
अपंगत्वावर मात करून दहावीत मिळविले यश
पेण तालुक्यातील दिव गावातील दीपिका म्हात्रे या गरिबी व अपंगत्वावर मात करत रायटर नाकारून स्वतः पेपर लिहून वयाच्या ३७ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी ६९.२० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सेकंड चान्स प्रोग्राममधून शिक्षणाची संधी मिळवून आपली जीवन दिशा बदलणाऱ्या महिलांपैकी त्या एक आहेत.
दीपिका म्हात्रे यांचे माहेरचे जीवन अतिशय गरिबीत गेले. त्यामुळे नववीपर्यंत शिक्षण घेता आले. आणि त्यांनतर लग्न झाले. पण सासरीही परिस्थिती हालाखीचीच होती. पती-पत्नी मजुरी करून घर चालवत होते. गर्भधारणेच्या वेळी त्यांना संधीवाताचा तीव्र झटका आला, आणि त्यात ६० टक्के अपंगत्व आले. त्यांच्या अपत्यालाही अपंगत्व आले. पण हार न मानता त्यांनी दहावीची परीक्षा देत यश मिळवले.





