आठवडाभरानंतरही खातेवाटपाचा तिढा कायम ! अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झाले. पण आठवडाभरानंतरही खातेवाटपाचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे. तरी यावर मार्ग काढत लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे.
साधारणतः आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही शरद पवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजुनही त्यांचे खातेवाटप झालेले नाही. दुसरीकडे शिंदे गटातील इतर काही आमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रीपदाचे दावे केले होते.
अशातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या मंत्र्यांचे खातेवाटप केले जाईल.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होत आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन सुरू राहणार आहे. अशातच पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करुन खातेवाटप करण्याचा मानस शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा आहे.





