दहा वर्षांनंतरही बीआरटी मार्ग अपूर्ण… पीएमपीकडून पिंपरी-चिंचवडसोबत दुजाभाव

पिंपरी (प्रकाश यादव) – नागरिकांना जलद गतीने सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सहा बीआरटीएस मार्गाचे जाळे उभारण्याचे नियोजन केले. मात्र, दहा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही काही मार्गावर अद्याप बस सेवाच सुरू झाली नसल्याने कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसत आहे. एकीकडे महापालिका वारेमाप उधळपट्टी करीत असून, दुसरीकडे उदासीन पीएमपीएमएल प्रशासन बस नसल्याचे कारण देत शहरातील बीआरटी प्रकल्पाबाबत दुजाभाव करीत आहे.
शहरातील नाशिक फाटा ते वाकड आणि सांगवी फाटा ते किवळे या मार्गावर सेवा सुरू झाली. न्यायालयीन लढ्यानंतर दापोडी ते निगडी सेवा रखडखडत सुरू झाली. मात्र, इतर किवळे ते निगडी मार्गावर जागा ताब्यात नसल्याने उड्डाणपुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता अपूर्ण आहे. परिणामी, बस सेवा ठप्प आहे. ती जागा नुकतीच महापालिकेच्या ताब्यात आली असून, तेथील अतिउच्चदाब विद्युत वाहिन्या उभारण्याचे काम सुरू आहे. एकूण 5 खांब उभारण्यात आले आहेत. तसेच रेल्वे व एमएसईबीची फिडर लाइनही स्थलांतरित करावी लागणार आहे. त्यानंतर उड्डाणपूल व जोड रस्ता बांधण्यात येईल. त्यासाठी आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे. मार्गातील लघुउद्योगांचे स्थलांतर रखडले तर, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटी मार्गावरील ऑटो क्लस्टर व आयुक्त बंगल्यासमोरील युरोसिटी व इंड्रोलिक इंडस्ट्रियलची केवळ साडेतीन हजार चौरस मीटर जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्या उद्योगांना पालिकेने सन 2007 ला नोटीस दिली होती. त्या जागेतील कंपन्या व लघुउद्योगांचे इतरत्र स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यानंतर ती जागा पालिकेस उपलब्ध होणार आहे.
बोपखेल ते दिघी मार्ग तयार होऊनही त्या मार्गावर बस सेवा सुरू नाही. या मार्गावर ट्रायल सुरू करण्यात आली आहे. हा मार्ग सुरू करण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे अनेक थांब्यांची दुरवस्था झाली आहे. पिंपरी-चिंचवडबाबत दुजाभाव करणाऱ्या पीएमपीकडून बीआरटी बस उपलब्ध नसल्याचे कारण देत हातवर केले जात आहेत. मात्र, पीएमपीएलकडून संचलन तुटीसाठी पालिकेकडून दरमहा 40 टक्के निधी हक्काने वसूल केला जात आहे. पालिका तो निधी अदाही वेळच्या वेळी करीत आहे. मात्र, शहरावासी जलद प्रवासी सेवेपासून वंचित आहेत.
हे आहेत शहरातील बीआरटी मार्ग
दापोडी ते निगडी – 12 किमी
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता – 11 किमी
नाशिक फाटा ते वाकड 8 किमी
सांगवी फाटा ते किवळे 14 किमी
बोपखेल ते दिघी-8 किमी
किवळे ते निगडी भक्ती शक्ती चौक- 3.7 किमी
जागा ताब्यात घेऊन कार्यवाहीस वेग
ऑटो क्लस्टरसमोरील बीआरटी मार्गावरील उद्योगाचे स्थलांतर करण्यासाठी एमआयडीसीच्या केएसबी चौकातील डी टू ब्लॉक येथील जागा देण्यात आली आहे. त्यासाठी 7 कोटी महापालिकेने एमआयडीसीला दिले आहेत. बांधकाम परवानगी घेतल्यानंतर 9 महिन्यात उद्योजक बांधकाम पूर्ण करणार आहेत. त्या कालावधीत ती जागा पालिकेस हस्तांतरण होईल. जागा ताब्यात येताच रस्ता जोडला जाणार आहे. अतिउच्चदाब विद्युतवाहिनी स्थलांतर करण्याचे काम सुरू झाले. तसेच इतर सेवावाहिन्यांचे स्थलांतर झाल्यानंतर उर्वरित उड्डाणपूल व ऍप्रोच रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे स्थापत्य प्रकल्प विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
बसथांबे भिकाऱ्यांचे आश्रयस्थान
कोट्यावधी खर्च करून पालिकेने बीआरटीएसचे स्मार्ट बस थांबे उभारले. मात्र, त्यांची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्याने तेथे अस्वच्छता आहे. गुटखा, पान व तंबाखूच्या पिचकाऱ्या भिंतीवर दिसतात. प्रकाश व्यवस्थाही अपुरी असते. दुर्लक्षित थांबे हे भिकाऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहेत. खराब थांबे दुरुस्त केले जात नसल्याने शहर विद्रूपीकरण होत आहे.





