गाझातील मदतीचे क्षेत्र रिकामे करा; इस्रायलकडून पॅलेस्टिनींना आदेश

डेरअल-बलाह (गाझा पट्टा) : गाझामध्ये मदत पोचवण्यासाठी निश्चित केलेल्या मार्गाचा काही भाग रिकमा करण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्यदलाने पॅलेस्टिनी नागरिकांना दिले आहेत. या भागातून हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. हा मार्ग अत्यंत दाटीवाटीचा आहे. इस्रायलच्या सैन्याच्या आदेशामुळे या भागातील हजारो पॅलेस्टिनींना आपल्या मुलाबाळांसह सामानची गाठोडी घेऊन स्थलांतर करावे लागते आहे. युद्ध सुरू झाल्यापासून हजारो पॅलेस्टिनींना जीव वाचवण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा स्थलांतर करावे लागले आहे. आतापर्यंत सातवेळा स्थलांतर केलेल्या नागरिकांना आता कोठे सुरक्षित आश्रय शोधावा, हे देखील समजेनासे झाले आहे.
हमासचे दहशतवादी या सुरक्षित मार्गाच्या आडून इस्रायलवर रॉकेट हल्ले करत आहेत. त्यामुळे या भागात कारवाई केली जाणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या सुरक्षित कॉरिडॉरमध्ये गाझाच्या दक्षिणेकडील मुनवासी मदत क्षेत्राचा पूर्वेकडील भाग आहे. एकूण १४ किलोमीटरच्या या भागामध्ये सुमारे १.८ दशलक्ष पॅलेस्टिनींनी आश्रय घेतल्याचा अंदाज आहे. गाझाच्या दक्षिणेकडील भागात सध्या २.३ दशलक्ष लोकसंख्या आहे. या पॅलेस्टिनींनी या भागात तंबू ठोकले आहेत. येथे स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा देखील नाहीत. सांडपाण्याची व्यवस्था देखील नसल्यामुळे या भागात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राकडून पाठवली जाणारी मदत फारच अपुऱ्या प्रमाणात येथे पोचते.
हमास आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या वाटाघाटींमध्ये सध्या कोणतीही प्रगती झालेली नाही. चर्चेमध्ये मात्र पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रगती झाली असल्याचे इस्रायलच्या मध्यस्थांनी म्हटले आहे. ही चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी इस्रायलचे पथक गुरूवारी पुन्हा रवाना केले जाणार आहे. या चर्चेसाठी इजिप्त, कतार आणि संयुक्त राष्ट्राने विशेष आग्रह धरला आहे. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान अमेरिकेचे अध्यक्ष बेन्जामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. हमासचे सैन्य आणि प्रशासकीय व्यवस्था पूर्ण नष्ट करण्याचा निर्धारही त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे.
मृतांचा आकडा ३९ हजारांच्या पुढे
हमास विरोधात इस्रायलने सुरू केलेल्या युद्धात मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या आता ३९ हजारांच्या पुढे गेली आहे, तर ८९ हजार ८०० जण जखमी झाले आहेत, असे गाझामधील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मृतांमध्ये हमासचे दहशतवादी किती आणि सामान्य पॅलेस्टिनी किती आहेत, याची वेगवेगळी आकडेवारी देण्यात आलेली नाही.





