Ethanol Petrol: इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन धोक्यात? साताऱ्यातील गाड्या इथेनॉलमुळे खराब
Ethanol Petrol: साताऱ्यातील गॅरेजमध्ये रोज ३ ते ४ गाड्या इथेनॉल मिश्रणामुळे नादुरुस्त; हवेतील ओलावा शोषल्याने टाकीच्या तळाशी साचतोय पाण्याचा थर.

Ethanol Petrol – सातारा शहरातील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणार्या वाहनाची संख्या जास्त असली तरी त्यातील 3-4 गाड्या इथेनॉलमुळे खराब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. सध्या बाजारात मिळणार्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे 20 टक्के प्रमाण आहे. या प्रमाणामुळे वाहनधारकाच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमुळे टाकीच्या तळाशी पाणी साचल्याने लोखंडी टाक्यांना आतून गंज चढल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
शहरातील छोट्या गॅरेजमध्ये रोज येणार्या 15 ते 20 गाड्यांपैकी सरासरी 3 ते 4 गाड्या केवळ इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे दुरस्तीसाठी येत आहेत. थेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे कार्बोटर, पिस्टन, व्हॉल्व खराब होत आहेत. टाकीतले संपूर्ण पेट्रोल काढून नवीन पेट्रोल टाकल्यानंतरच दुरुस्ती, मायलेज कमी झाल्याच्याही तक्रारी ग्राहकांकडून येत असल्याचे मेकॅनिक सांगत आहेत. इथेनॉलमध्ये हवेतील ओलावा (पाणी) शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. जर गाडी काही दिवस एकाच ठिकाणी पडून राहिली, तर पेट्रोलमधील इथेनॉल पाण्याचा थर तयार करते.
यामुळे बहुतांशी समस्या तयार होत आहेत. टाकीच्या तळाशी पाणी साचल्यामुळे लोखंडी टाक्यांना आतून गंज चढतो. हा गंज पुढे पेट्रोल पाईपमध्ये जातो. इंजेक्टर आणि कार्बोरटर नादुरुस्त होत आहेत. गंजलेला कचरा आणि इथेनॉलच्या रासायनिक प्रक्रियेमुळे तयार झालेला चिकट थर यामुळे इंजिनचे महत्त्वाचे भाग जाम होतात. जुन्या गाड्यांमधील रबरचे पाईप्स आणि गॅस्केट इथेनॉल सहन करू शकत नाहीत, ज्यामुळे इंधन गळतीचा धोका वाढत असल्याचे दुचाकीच्या मॅकेनिकनी सांगितले.
वाहनधारकानी ही काळजी घ्यावी…
पेट्रोल टाकी अर्धी किंवा त्याहून अधिक भरलेली ठेवा. ज्यामुळे आत ओलावा तयार होण्यास जागा मिळणार नाही. फ्युएल फिल्टर नियमित बदला. प्रत्येक सर्व्हिसिंगच्या वेळी फ्युएल फिल्टर आवर्जून तपासून घ्या किंवा बदला.गाडी रोज 5 ते 10 मिनिटे तरी सुरू ठेवा किंवा चालवत जावा.





