रशियाच्या वॉन्टेड यादीमध्ये आलं ‘या’ देशाच्या पंतप्रधानाचे नाव

नवी दिल्ली – इस्टोनियाचे पंतप्रधान काजा कलास यांचे नाव रशियाच्या वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे. गुन्हेगारी आरोप असलेल्या लोकांच्या रशियाच्या अधिकृत यादीमध्ये ही नोंद झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
युक्रेनच्या मुद्यावरून रशिया आणि पाश्चात्य देशांमधील तणाव वाढत असताना ही बाब उघड झाली आहे. मात्र कलास यांच्यावर कोणते आरोप आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
वॉन्टेड लोकांच्या यादीमध्ये रशियाने प्रथमच विदेशी नेत्याचे नाव समाविष्ट केले आहे. कलास हे युक्रेनचे कडवे समर्थक आहेत. युक्रेनला लष्करी सहाय्य मिळवून देण्यासाठी आणि रशियावर निर्बंध घालण्यासाठीच्या प्रचारात ते नेहमीच आघाडीवर असतात. दुसऱ्या महायुद्धातील रशियाच्या सैनिकांचे स्मारक हटवण्याचाही त्यांनी आग्रह धरला आहे.
युद्ध स्मारकाना बदनाम करण्याबद्दल शिक्षेची तरतूद असलेला नाझीकाळातील कायदा रशियामध्ये लागू केला गेला आहे. इस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री पेटरकोप यांनाही रशियाने वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत टाकले आहे.
युक्रेनविरुद्धच्या युद्धाला २ वर्षे पूर्ण होत असताना नाटोच्या सदस्य देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी रशियाने हा उद्योग सुरू केला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि पाश्चात्यांंमधील संबंध गोठवले गेले असल्यामुळे या वॉन्टेड यादीचा काही परिणाम होणार नाही.





