20 कोरोना पेशंट्सचे कोविड सेंटरमधून पलायन; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
Updated On:

यवतमाळ, दि. 25 – यवतमाळमधील एका कोविड केअर सेंटरमधून 20 कोविडग्रस्तांनी पलायन केल्याची बातमी आहे. अधिकृत सूत्रांनी याला दुजोराही दिला आहे. घटंजी तालुक्यातील एका विद्यार्थी वसतिगृहात हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. तेथून या रुग्णांनी पलायन केले आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी या बाबतीत पोलीस तक्रार नोंदवली आहे. या संबंधात मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आमडी गावात गेल्या शुक्रवारी कोविड तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. त्यावेळी 19 ग्रामस्थ कोविडग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यांना या सेंटरमध्ये शनिवारी दाखल करण्यात आले होते. काल रात्री आठ वाजता या रुग्णांनी पलायन केले. यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. असे प्रकार झाले तर करोनावर नियंत्रण आणणे कठीण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.





