पिंपरी | ३० वर्षांनी खड्डेमय रस्त्यातून सुटका

खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली – शेणगाव परिसरातील मुख्य रस्त्याची चाळण झाली होती. ग्रामपंचायतीने याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर निधी उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला वेग आला असून पावसाळ्यात सुखकर प्रवास होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
माणकिवली येथील मुख्य रस्ता हा गेल्या ३० वर्षांपासून खड्डेमय होता. अवजड वाहतुकीमुळे येथील रस्त्याची चालण झाली होती. अनेकजण येथून प्रवास करणे टाळत होते. येथील रहिवाशी व प्रवाशांची समस्या लक्षात घेत येथील ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला.
आमदार महेंद्र थोरवे यांनी या रस्त्याच्या नुतनीकरणाकरता निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणचा रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली असून कामाला वेग आला आहे. काही अंतराचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
गावचा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्याच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे इथून प्रवास करणे जिकरीचे बनले होते. याबाबत स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी गावाच्या रस्त्याकरता भरीव निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे. काम उत्तम दर्जाचे व्हावे, यासाठी आम्ही वेळोवेळी दक्षता घेत आहोत, असे ग्रामस्थ विष्णू ठोंबरे यांनी सांगितले.
….





