#EPL : ब्रायटनकडून बलाढ्य अर्सेनलचा पराभव

लंडन – करोनाचा धोका कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरु झालेल्या इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य अर्सेनल संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ब्रायटन संघाने त्यांचा 2-1 असा पराभव केला.
निकोलस पेप याने 68 व्या मिनिटाला अर्सेनलकडून पहिला गोल नोंदवला व आघाडी घेतली. त्यावेळी ते सामन्यावर वर्चस्व राखून विजय मिळवणार असेच चित्र होते. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये ब्रायटनने बाजीच पलटवली. 75 व्या मिनिटाला लुईस डंक याने गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली.
सामना संपण्यास 15 मिनिटे बाकी असताना केलेला हा गोल अर्सेनलसाठी डोकेदुखी ठरला. त्यांच्या बचावाला खिंडार पडले. त्यानंतर अचानक ब्रायटनच्या खेळात आक्रमकता आली व त्यांनी सातत्याने
अर्सेनलवर दडपण टाकले. दुसरीकडे ब्रायटनचा बचाव भेदणे अर्सेनलला जमलेच नाही. सामना अतिरीक्त वेळेत गेल्यावर ब्रायटनच्या निल मोपे याने अफलातून गोल केला व संघाचा अविश्वसनिय विजय मिळवून दिला.
दोनच दिवसांपूर्वी झालेल्या लढतीत अर्सेनलला मॅंचेस्टर सीटी संघाकडून 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. रविवारच्या सामन्यात ब्रायटनविरुद्ध ते आपला खेळ उंचावतील अशी अपेक्षा होती मात्र, ती फोल ठरली. मुख्य खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे या स्पर्धेतील अर्सेनलचा संघ परिपूर्ण वाटत नसून त्यांना गेल्या तीन दिवसांत दोन पराभव पत्करावे लागले आहेत.
करोनाचा धोका कमी झाल्यानंतर या स्पर्धेतील स्थगित झालेल्या साखळी सामन्यांना पुन्हा एकदा सुरूवात झाली. मात्र, अद्याप अर्सेनलला सूर सापडल्याचे दिसत नाही. आता पुढील सर्व सामने त्यांना स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी जिंकावेच लागणार आहेत.




