पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नदी सुधार प्रकल्पासाठी आवश्यक असलेला पर्यावरण ना-हरकत दाखला व सुमारे २७०० कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इंद्रायणी नदीसाठी पर्यावरण ना-हरकत दाखला मिळालेला असला तरी पवना नदीच्या प्रकल्पासाठी तो अद्याप मिळालेला नाही. पावसाळी अधिवेशनात यास मंजुरी देऊन प्रकल्प मार्गी लावावा, अशी विनंती वाघेरे यांनी केली आहे. महापालिकेने २०१८ मध्ये एचसीपी डिझाईन प्लॅनिंग मॅनेजमेंट प्रा. लि. या सल्लागार संस्थेकडून दोन्ही नद्यांचे सर्वेक्षण करून नदीपात्रातील सांडपाणी, अनधिकृत भराव आणि अतिक्रमणाची सविस्तर माहिती गोळा केली होती. २०१२ मध्ये प्राथमिक प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या एनआरसीडीकडे सादर केला होता. २०१३ व २०१४ मध्ये सुधारित अहवाल सादर करूनही केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे प्रकल्प रखडला. नवीन विस्तृत प्रकल्प अहवालानुसार पवना नदीसाठी १५०० कोटी, तर इंद्रायणीसाठी १२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वाघेरे यांनी या प्रकल्पासाठी तातडीने पर्यावरण मान्यता व निधी मंजूर करून शहराच्या जलसंपत्तीचे संवर्धन सुनिश्चित करावे, अशी आग्रही मागणी केली आहे.