Lumpy Skin Disease : सातारा तालुक्यातही लंपी स्किनचा शिरकाव

सातारा (प्रतिनिधी) – कराड, फलटण पाठोपाठ सातारा तालुक्यातही लंपी स्किनचा (Lumpy Skin Disease) शिरकाव झाला आहे. सातारा तालुक्यातील महागाव व पांढरवाडी येथील 8 जनावरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागाने या गावांच्या पाच किलीमीटर परिसरात लसीकरण सुरु केले आहे. जिल्ह्यात आजअखेर 32 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाली आहे.
जिल्ह्यात वाघेरी (ता. कराड) येथील 12 जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाची लक्षणे आढळून आली. या जनावरांचे रक्ताचे नमुने व गाठीचा छोटा भाग तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. याबाबत प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आलो. फलटण तालुक्यातही फडतरेवस्ती, माडकरवस्ती आणि खामगाव येथील 8 जनावरांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करण्यात येत आहे.
सातारा तालुक्यातील महागाव व पांढरवाडी येथील 12 जनावरांमध्ये लंपी स्किनची लक्षणे आढळली होती. याबाबत पुणे येथील पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जिल्ह्यात आजअखेर 32 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
कराड, फलटण पाठोपाठ सातारा तालुक्यात लंपी स्किनची बाधित जनावरे आढळून आल्याने जिल्ह्यात खबरदारी घेण्यात येत आहे. जनावरांमध्ये लंपी स्किनची लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय रुणालयाशी संपर्क साधावा. ज्या भागात लंपी स्किनची जनावरे आढळत आहेत त्या पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.





