सातारा – बनवडीत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

यशवंतनगर – मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला 25 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेट दिला होता. मात्र, सरकार आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट जरांगे-पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना पाठींबा देण्यासाठी बनवडी, ता. कराड येथे राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केल्याचा फलक लावला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला राज्यातून वाढता पाठींबा मिळत आहे. त्यानुसार कराड तालुक्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याचे फलक झळकले आहेत. त्यानुसार मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी बनवडी येथील सकल मराठा समाज व ग्रामस्थ यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेश बंद केला असून तसा फलक गावाच्या मध्यभागी लावला आहे. या फाकावर जो समाजाला मानत नाही, त्याला समाज मानत नाही.
सावधान… सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आमच्या गावात प्रवेश बंद आहे. “एकच मिशन, मराठा आरक्षण’, “चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’, आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. सकल मराठा समाज, समस्त बनवडी ग्रामस्थ, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. फलक लावताना सकल मराठा समाज, ग्रामस्थ उपस्थिती होते.





