Ashok Saraf : “आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही…”; अशोक सराफांचा Gen-Z ला खास सल्ला, थेट म्हणाले….
अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Ashok Saraf : मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा मिश्कील अभिनय, भन्नाट टायमिंग आणि कोणत्याही भूमिकेला आपल्या शैलीने जिवंत करण्याची खासियत. रंगभूमीपासून चित्रपट आणि मालिकांपर्यंत आपल्या अभिनयाची अमिट छाप उमटवणाऱ्या अशोक सराफ यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत असंख्य भूमिका अजरामर केल्या.
मात्र अभिनयाइतकाच त्यांचा परखड आणि मिश्कील स्वभावही कायम चर्चेत राहिला आहे. आता वयाची 80 वर्षे गाठतानाही त्यांच्या विचारांमध्ये तितकाच उत्साह आणि स्पष्टपणा पाहायला मिळतोय. नुकत्याच एका विशेष संवादात त्यांनी आजची पिढी, Gen-Zची विचारसरणी आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याचा अधिकार यावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. विशेष म्हणजे, तरुण पिढीला सल्ला देताना त्यांनी नेहमीच्या उपदेशाच्या चौकटीत न जाता तिची बाजूही समजून घेतली.
नागपुरात अशोक सराफांचा भव्य नागरी सत्कार
अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं अनेक दशकं मनोरंजन करणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. या सोहळ्यात अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांना विचारलं, “आजच्या पिढीला काय सांगाल?” हा प्रश्न ऐकताच अशोक सराफ यांनी आपल्या नेहमीच्या मिश्कील अंदाजात प्रतिप्रश्न केला, “छान, छान प्रश्न आहे हा. आजची पिढी… ऐकेल?” त्यावर पुष्कर यांनी, “तुमचं नक्की ऐकेल,” असं म्हटलं. मात्र अशोक सराफ यांनी लगेचच आपल्या विनोदी शैलीत, “सांगता येत नाही. आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही,” असं उत्तर दिलं.त्यांच्या या एका वाक्यावर उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटली.
आजची पिढी मोठ्यांचं ऐकत नाही, अशी तक्रार अनेकदा केली जाते. मात्र अशोक सराफ यांनी त्यावर केवळ टीका करण्याऐवजी तरुणांच्या विचार करण्याच्या पद्धतीमागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न केला. “अर्थात ऐकत नाही, याला त्यांचीही काही कारणं असतील. आम्ही म्हणतो ते पण बरोबर आहे, असंही होऊ शकतं,” असं ते म्हणाले.
‘कोणाच्या सांगण्याच्या भानगडीत पडूच नये…’
अशोक सराफ यांनी पुढे स्वतःच्या निर्णयांबाबतही महत्त्वाचं मत व्यक्त केलं. एखाद्याने आपल्याला सल्ला दिला म्हणून तो स्वीकारायलाच हवा, असं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “कोणाच्या सांगण्याच्या भानगडीत पडूच नये, ही गोष्ट चांगली आहे. त्याचा काही उपयोग नाही,” असं ते म्हणाले.
अशोक सराफांचा ‘Gen-Z’कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन
आजच्या काळात Gen-Zच्या जीवनशैलीपासून त्यांच्या विचारसरणीपर्यंत अनेकदा चर्चा आणि टीका होताना दिसते. मात्र अशोक सराफ यांनी या पिढीकडे केवळ जुन्या पिढीच्या चष्म्यातून पाहण्याऐवजी “आपण म्हणतो तेच योग्य असेल असं नाही”, ही जाणीव करून दिली.
80व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अशोक सराफ यांचा हा विचार त्यांच्या अनुभवाइतकाच महत्त्वाचा ठरतोय. कारण पिढ्या बदलत राहतात, विचार करण्याच्या पद्धती बदलतात; मात्र स्वतःच्या बुद्धीने विचार करण्याचा आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक पिढीला असतो, हा त्यांचा संदेश आजच्या तरुणांसोबतच पालक आणि ज्येष्ठ पिढीसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.







