Sharad Pawar : 34 वर्षांनी विधानभवात एन्ट्री; एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन भेट, पवारांनी नेमका कोणता संदेश दिला?
Sharad Pawar : बैठकीनंतर शरद पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. हीच भेट सध्या चर्चेचा विषय ठरत असून याचे अनेक अर्थ लावले जात आहे.

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात काल घडलेल्या एका राजकीय घडामोडीमुळे तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. महाराष्ट्र-कनार्टक सीमाप्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आले होते. या बैठकीला अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीची. तब्बल ३४ वर्षांनी शरद पवार विधानभवनात दाखल झाल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चांमध्ये शिंदे-पवार भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शरद पवार विधानभवनात आल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत स्वागत केले. शरद पवार आल्याचे कळताच एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठक सोडून त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. बैठकीनंतर शरद पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. हीच भेट सध्या चर्चेचा विषय ठरत असून याचे अनेक अर्थ लावले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बदल घडणार असल्याचे संकेत तर नाही ना असेही बोलले जात आहे.
वरकरणी ही शिष्टाचाराची भेट वाटत असली, तरी तिची वेळ, पार्श्वभूमी आणि घडलेला घटनाक्रम पाहता या भेटीचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. विशेष म्हणजे, यावेळी शरद पवारांसोबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हेही उपस्थित होते.
हेही वाचा : Eknath Khadse : एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण
शिंदे-पवार यांच्यात सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीसाठी रवाना झाले, तर शरद पवार काही वेळ त्यांच्या दालनातच थांबून पक्षाच्या आमदारांशी संवाद साधत होते. थोडक्यात आमदारांची बैठक घेतली.
शिंदे-पवार भेटीची राजकीय पार्श्वभूमीही महत्त्वाची मानली जात आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिंदे यांची नजर शरद पवार गटातील खासदारांवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत पवारांनी थेट शिंदे यांच्या दानलात जाऊन भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
काही राजकीय विश्लेषकांच्या मते, या भेटीतून शरद पवार यांनी सत्तेतील विविध केंद्रांशी संवाद कायम असल्याचा संदेश दिला असावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दरम्यान, १५ मिनिटांच्या चर्चेत नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले, याबाबत शरद पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतेही सार्वजनिक भाष्य केलेले नाही. त्यामुळे या भेटीमागील राजकीय अर्थ आणि संभाव्य परिणाम काय असतील, याकडेच राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Share Market: ट्रम्प यांच्या धमक्या निष्फळ ! शेअर बाजार तेजीने उघडले; सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले





