Pune District : बळीराजाच्या घामाला न्याय मिळवून देणे, हीच आमची बांधिलकी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Pune District : कृषी दिनानिमित्त राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी नव्या उमेद, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आत्मविश्वासाने शेतीचा विकास साधावा, असे आवाहन करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील बळीराजाला उत्तम आरोग्य, समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.

इंदापूर : “बळीराजाचा सन्मान, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला आणि शेती अधिक सक्षम व समृद्ध करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. त्यांनी कृषी दिनानिमित्त राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, संकटाच्या काळात आधार मिळावा आणि उत्पादनक्षमतेत वाढ व्हावी, यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. पीक विमा, सिंचन विकास, कृषी पायाभूत सुविधा, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी कर्जमाफी व आर्थिक दिलासा यांसारख्या उपाययोजनांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करणे आणि त्याचा विकास साधणे, हेच शासनाचे सर्वोच्च ध्येय आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन महाराष्ट्रातील बळीराजा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी दिनानिमित्त राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी नव्या उमेद, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आत्मविश्वासाने शेतीचा विकास साधावा, असे आवाहन करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील बळीराजाला उत्तम आरोग्य, समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, दर्जेदार बियाणे, पीक विमा, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, बाजारपेठेपर्यंत सुलभ पोहोच आणि मूल्यवर्धन या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना राज्य शासनही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निर्णय घेत आहे.
– दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.





