Satara: वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
Satara ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांचा लाभ अपेक्षित प्रमाणात संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेकदा योजनांची माहिती नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने नागरिक लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे केवळ योजना जाहीर करून चालणार नाही, तर त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

Satara: कातकरी, गोसावी, पारधी आदी वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आजपासून एका नव्या उपक्रमाची सुरुवात होत आहे. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांना योजनांची माहिती मिळाली पाहिजे आणि समाजातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि राज्याचा महसूल विभाग यांच्यावतीने सातारा तालुका पंचायत समितीत कातकरी, गोसावी, पारधी समाजातील नागरिकांना आधार कार्ड, शासकीय योजनांची कागदपत्रे वाटप; आरोग्य शिबिर उत्साहात झाले. याप्रसंगी ना. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य सर्जेराव सावंत, कामेश कांबळे, पूजा मोरे, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, उपसभापती सुषमा जाधव, सदस्य राहुल शिंदे, प्रभाकर पवार यांच्यासह सदस्य, प्रांताधिकारी आशिष बारकुल, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, अधिकारी आणि कातकरी, पारधी व गोसावी समाजातील नागरिक उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांचा लाभ अपेक्षित प्रमाणात संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेकदा योजनांची माहिती नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने नागरिक लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे केवळ योजना जाहीर करून चालणार नाही, तर त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कातकरी, गोसावी आणि पारधी समाजातील नागरिकांना एकत्रितपणे विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमातून महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात येत आहे. या समाजातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.’’ यावेळी राजू भोसले, महेश गाडे आदींनी मनोगत व्यक्त केले.





