#ENGvIND : उसळत्या चेंडूंमुळेच अँडरसन-बुमराह यांच्यात वाद

लंडन – भारत व इंग्लंड यांच्यातील लॉर्डस मैदानावर झालेल्या कसोटीत जेम्स अँडरसन व जसप्रीत बुमराह यांच्यात झालेल्या वादाचे नेमके कारण आता उघडकीस आले आहे. अँडरसन फलंदाजी करत असताना बुमराहने त्याला गोलंदाजी करताना सातत्याने उसळते चेंडू टाकल्यामुळे या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
हा सामना भारताने 151 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान जेम्स अँडरसन-विराट कोहली, अँडरसन-जसप्रीत बुमराह, जोस बटलर-बुमराह यांच्यात शाब्दिक देवाण-घेवाण झाली होती.
यातील अँडरसनने बुमराहला विचारले होते की आधीच्या फलंदाजांना तू धिम्या गतीने चेंडू टाकत होतास, मग मी फलंदाजीला आल्यावर वेगवान चेंडू का टाकत आहेस. त्यावर बुमराहनेही त्याला काही सुनावले होते.
मात्र, बुमराहने दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय संघातील खेळाडूंशी गैरवर्तन केले. त्यामुळेच खरेतर भारतीय संघ पेटून उठला व इंग्लंडचा पराभव केला.





